सोळा महिन्यांत तीन परवाने रद्द, ६८ औषधी दुकाने निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:15 PM2024-11-06T13:15:11+5:302024-11-06T13:16:24+5:30
अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई : दुकानदारांना हयगय करणे भोवले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एप्रिल २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अन्न व औषधी प्रशासन विभाग, भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील अनेक औषधी दुकानांची तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याने तीन औषधी दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच स्टॉक व विक्रीत तफावत तसेच अन्य कारणांसाठी ६८ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. ही कारवाई औषधी निरीक्षकांच्या तपासणीअंती सहायक आयुक्त (औषधी) मोनिका धवड यांनी केली.
औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९४५ अंतर्गत औषध विक्री व साठवणूक यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना मेडिकल स्टोअर्स चालकांना देण्यात आल्या आहेत. परंतु, अनेकदा औषध विक्रेते नियम व कायद्याचे पालन न करता मनमर्जीने औषधांची विक्री करीत असतात. तसेच ग्राहकांना बिल न देणे, स्टॉक बूकवर नोंदी न घेणे, प्रतिजैविक औषधांचे बिल न देणे तसेच अन्य गैरप्रकार करताना दिसून येतात.
यामुळे ग्राहकांचे तसेच शासनाचे नुकसान होत असते. शिवाय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे विकल्यास त्याचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागण्याची शक्यता असते. यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागांच्या निरीक्षकांतर्फे औषध दुकानांचे तपासणी करण्यात येत असते.
या दुकानांचे परवाने झाले रद्द
औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकणे व अन्य कारणांसाठी मे. कोरे मेडिकल अँड जनरल स्टोअर्स पळसगाव सोनका, मे. अक्षय मेडिकल स्टोअर्स मोहाडी, मे. कुसुम मेडिकल स्टोअर्स कांद्री आदी तीन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले.
४६ दुकानदारांनी स्वतःहून केले परवाने रद्द
जिल्ह्यात औषधी दुकानांत मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढीस लागली आहे. त्यातच शहरातील बहुतेक डॉक्टरांनी स्वतःचेच मेडिकल स्टोअर्स उघडले आहेत. त्यामुळे अन्य मेडिकल स्टोअर्स चालनासे झाले आहेत. किराणा व स्वतःची मजुरीही दुकानातून निघत नसल्याने जिल्ह्यातील ४६ औषध विक्रेत्यांनी स्वतःहून दुकानांचे परवाने रद्द करण्याचे पत्र दिले. त्यामुळे त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.
विक्रेत्यांनी या बाबींची घ्यावी काळजी
नोंदणीकृत फार्मासिस्ट दुकानात बसावे व स्वतःच्या देखरेखीत औषधांची विक्री करावी. सेक्स तसेच झोपेच्या गोळ्या व अन्य गंभीर आजारावरील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करू नये. औषधांची विक्री व स्टॉकची माहिती अद्ययावत ठेवावी. व्हेटर्नरी औषधांची साठवणूक लेबलसह करावी.
"औषध विक्रेत्यांनी नियम व कायद्याचे पालन करीत औषधांची विक्री करण्याचे गरजेचे आहे. परंतु, मेडिकल स्टोअर्स चालकांनी हयगय केल्याने तसेच औषधी निरीक्षकांच्या तपासणीत दोषी आढळून आल्याने तिघांचे परवाने रद्द तर ६८ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले."
- मेनिका धवड, सहायक आयुक्त (औषधी), भंडारा.