तीन महिन्यात सुकळी-देव्हाडी पूल धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:58 PM2018-06-13T22:58:10+5:302018-06-13T22:58:10+5:30
बावनथडी प्रकल्प अंतर्गत लहान वितरिकेच्या कामाकरिता सुकळी-देव्हाडी रस्त्यावर लहान पूल तयार करण्यात आले. सदर बांधकामाला केवळ तीन ते चार महिने झाले. या पूलावर खचके पडले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. येथे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामाची गुणवत्ता कशी असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी प्रकल्प अंतर्गत लहान वितरिकेच्या कामाकरिता सुकळी-देव्हाडी रस्त्यावर लहान पूल तयार करण्यात आले. सदर बांधकामाला केवळ तीन ते चार महिने झाले. या पूलावर खचके पडले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. येथे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामाची गुणवत्ता कशी असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुकळी ते देव्हाडी रस्त्यावर सुकळी गावापासून हाकेच्या अंतरावर बावनथडी वितरिकेच्या कामाकरिता सिमेंट पायली घालून पूल तयार करण्यात आले. सुमारे तीन ते चार महिन्यापुर्वी हा पूल तयार करण्यात आले. सध्या पुलावर खड्डे पडणे सुरू झाले आहेत. सदर खड्ड्यामुळे अपघाताची येथे शक्यता नाकारता येत नाही. बांधकामाची गुणवत्ता कशी असेल त्याचा प्रत्यय येथे येतो. शासकीय निधीचा दुरूपयोग कसा होतो त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. काम पूर्णत्वानंतर संबंधित बांधकाम अभियंत्यांनी काय काम केले असा प्रश्न उपस्थित होतो.
सुकळी दे. ते मांढळ तथा सुकळी दे. ते चारगाव हा रस्ता एकाच पावसात चिखलमय झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून जातानी जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्ते येथे सुरक्षित नाहीत. हा रस्ता पुढे भंडारा येथे जातो. या रस्त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. सुमारे तीन कोटीची निविदा येथे मंजूर झाली. परंतु प्रत्यक्ष कामाला अजून सुरूवात झाली नाही. पावसाळा सुरू झाला. चिखलमय रस्त्यावरून पुढील तीन महिने नागरिकांना मार्गक्रमण करावे लागणार आहे. सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी केली आहे.