ज्येष्ठांचे तीन महिन्यांचे मानधन अडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:37 AM2021-09-03T04:37:18+5:302021-09-03T04:37:18+5:30
कोरोना संकटाने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. दैनंदिन व्यवहार अडचणीचे झाले. शेतकऱ्यांच्या अनेक घरात निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. शेतकरी अठराविश्वे ...
कोरोना संकटाने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. दैनंदिन व्यवहार अडचणीचे झाले. शेतकऱ्यांच्या अनेक घरात निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. शेतकरी अठराविश्वे दारिद्र्यात आहे. संकटकालीन स्थितीत शासनाचे ज्येष्ठांना मिळणारे मानधन लाख मोलाचे ठरत आहे. दरमहा हजार रुपयाचे मानधन औषधीकरिता व कुटुंबाकरिता आधार आहे. परंतु जूनपासून लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने वृद्धांची आर्थिक अडचण वाढली आहे.
शासनाने दरमहा नियमित ज्येष्ठांना आर्थिक सहकार्य करणे काळाची गरज बनली आहे. फार जुनी असलेली योजना अजूनही टिकून आहे. यावरून योजनेचे महत्त्व शासनासह प्रशासनाला सुद्धा कळले आहे. गरजू लाभार्थ्यांना या योजनेमुळे हायसे वाटले आहे.
चौकट
वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना शासनाच्यावतीने हजार रुपये दरमहा मानधन पुरविले जाते. हजार रुपयांचे मानधन ज्येष्ठांना अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित मानधन मिळत नसल्याने आर्थिक समस्या येत आहेत. बँकेत जमा झाले का, म्हणून पायऱ्या झिजवण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. बँकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दररोज विचारणा वाढलेली आहे. बापू , बँकेत पैसे आले का गा! असे विचारताच नाही जी म्हणायला काळजात धस्स होत आहे.
कोट
वृद्धापकाळ मानधन योजनेचे दोन महिन्यांचा निधी अगदी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. जून व जुलै महिन्याचे मानधनाचे नियोजन सुरू आहे.
प्रतिभा दोनोडे, प्रभारी तहसीलदार लाखनी
मायबाप सरकार, प्रत्येक महिन्याला आमचे हजार रुपये दिले तर फारच चांगले होईल. महागाईत हजार रुपयेही पुरत नाहीत. उधारी कुणी देत नाही. दिलीच तर वस्तूंचे दर अधिक घेतात. याच पैशावर आमचे पोट आहे.
पारबता नेवारे, लाभार्थी पालांदूर