पुरलेले तीन नीलघोडे काढले बाहेर
By admin | Published: January 15, 2017 12:26 AM2017-01-15T00:26:43+5:302017-01-15T00:26:43+5:30
बोंडखिडकी शेतशिवारात विद्युत करंट लावून तीन नीलघोड्यांची शिकार केल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली.
तुमसर वनविभागाची कारवाई : आरोपीची कारागृहात रवानगी
तुमसर : बोंडखिडकी शेतशिवारात विद्युत करंट लावून तीन नीलघोड्यांची शिकार केल्याची घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी धर्मा पचघरे या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या बयाणावरून वनविभागाने जेसीबीच्या सहायाने जमिनीत पुरलेले तीन नीलघोडे बाहेर काढले. व पुराव्यांच्या आधारे आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
खडकी येथील शेतकरी धर्मा पचघरे (४०) याचे शेत बोंडखिडकी शिवारात आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. त्यामुळे त्याने वन्यप्राण्यांचा हैदोस थांबविण्या साठी शेताभोवताल विद्युत करंट लावले होते. घटना उघडकीस येण्याच्या १५ दिवसापुर्वी एक निलघोडा त्याच्या शेतशिवारात विद्युत करंटने मृत्यू झाल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पचघरे याने शेतातच खड्डा खोदून त्यात निलघोडे पुरले होते. शेतात विद्युत प्रवाह सुरूच ठेवल्यामुळे आणखी दोन निलघोडे त्यात अडकल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. तेही निलघोडेही त्याने जमिनीत पुरले होते. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना दुर्गंधी आल्यामुळे घटनास्थळाची पाहणी केली असता निलघोड्याचे शिकारीचे प्रकरण उघडकीस आले.
संशयित म्हणून धर्मा पचघरेला अटक केली. त्याची चौकशी केले असता त्याने कबुली देताच तुमसर वनविभागाने जेसीबीच्या सहायाने जमिनीतून निलघोडे बाहेर काढले व त्यांचा पंचनामा करून शवविच्छेदन केले. तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी वनपाल उके, राऊत वनरक्षक बन्सोड हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)