तीन अपघातात तीन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:18 PM2018-03-28T23:18:39+5:302018-03-28T23:18:39+5:30
जिल्ह्यात मागील १२ तासात घडलेल्या तीन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील दहेगाव, दुसरी घटना मुजबी येथे तर तिसरी घटना कारधा टोल नाका येथे घडली.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्ह्यात मागील १२ तासात घडलेल्या तीन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील दहेगाव, दुसरी घटना मुजबी येथे तर तिसरी घटना कारधा टोल नाका येथे घडली.
मोहाडी : जवळील दहेगाव येथे मोरगाव अर्जुनी येथील सुभाष सूर्यकांत उपरीकर हा सहा वर्षीय बालक रस्ता ओलांडत असताना बोलेरो वाहनाच्या तावडीत सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
मोरगाव अर्जुनी येथील सूर्यकांत उपरीकर हे आपल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी दहेगाव (मोहाडी) येथील पाटील देव मंदिरात आले होते. त्यांचा ६ वर्षीय मुलगा सुभाष याचा नवस फेडला. नंतर रस्त्याच्या पलिकडील शाळेत जेवणाचा कार्यक्रम होता.
आजोबा समोरील दुकानात गेले असता हा मुलगा आजोबाकडे गेला व नजर चुकवून मंदिराकडे रस्ता ओलांडून येत असताना राज्य मार्गावरून भरधाव येणाऱ्या बोलेरो पिकअपच्या गाडीखाली आला. यातच या बालकाचा करुण अंत झाला. वाहन क्रमांक एम.एच. २९ टी ६८९२ चा चालक आरोपी महेश ताराचंद शहारे (२७) रा.महालगाव ता.तुमसर याला अटक करण्यात आली आहे. या वाहनातून ५ बैलांना देव्हाडा येथून जवाहरनगर येथे नेण्यात येत होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगन्नाथ गिरीपुंजे, मिथून चांदेवार करीत आहेत.
अपघातात महिला ठार
भंडारा : कारधा टोल नाका येथे दुचाकी तथा चारचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिपर्यंत कारधा पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली होती. मृत महिलेचे नाव कळू शकले नाही. अपघातानंतर मात्र टोल परिसरात वाहनांची रांग तथा परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.