भंडारा जिल्ह्यात महाप्रसादातून ३०० जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:16 PM2020-01-06T14:16:26+5:302020-01-06T14:17:34+5:30
भंडारा जिल्ह्यात भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात गावभोजनासाठी गेलेल्या तब्बल ३०० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या रोहणी येथे रविवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात गावभोजनासाठी गेलेल्या तब्बल ३०० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या रोहणी येथे रविवारी घडली. पोटदुखी, जुलाब व उलटीचा त्रास झाल्याने बाधितांना कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अतीबाधितांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
रोहणी गावात मागील ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान रविवारी गोपालकाल्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाला आलेल्या परिसरातील हजारो नागरिकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रात्री शेकडो विद्यार्थी महिला व नागरिकांना पोटदुखी, जुलाब व उलटीचा त्रास जाणवू लागल्याने सबंधितांनी कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली.
यावेळी कुडेगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाधित रुग्णांची विचारपुस करुन औषधोपचार करीत आरोग्य विभागाकडे तात्काळ वैद्यकिय चमू हजर करण्याची मागणी केली. या घटनेतील काही अतिबाधित रुग्णांना लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन बाधितांवर औषधोपचार चालू आहे.