भंडाऱ्यात स्वच्छता मिशनचे तीनतेरा
By admin | Published: November 6, 2016 12:29 AM2016-11-06T00:29:04+5:302016-11-06T00:29:04+5:30
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मिशनचे धिंडवडे निघाले आहेत.
निवडणूक काळात सर्व ‘आलबेल’ : मार्केट परिसरासह सर्वच रस्त्यांवर कचराच कचरा
भंडारा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मिशनचे धिंडवडे निघाले आहेत. नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने पदाधिकारी निवडणुक कामात व्यस्त झाले असून स्वच्छतेची कामे कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहेत.
दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कामही जिकरीचे आहे. नगर पालिका प्रशासन यावर इमानेइतबारे कार्य करीत आहे की नाही हा संशोधनाचा किंबहूना विचार करण्याचा विषय असला तरी नागरिकांची मानसिकताही भंडाऱ्याला ‘गारबेज डम्प’ ची उपमा देत आहेत. परिणामी स्वच्छता मिशनचे तिनतेरा वाजले आहेत.
साफसफाई, जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण भंडारा शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरले आहे की काय, असे वाटते. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यात भंडारा शहर हरवून गेले आहे. लक्षावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या शहराची ही दुरवस्था शहराच्या विद्रुपतेत भर घालते.
कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात मागील वर्षी नगर परिषदेने स्वच्छता मोहीम राबवून बऱ्यापैकी साफसफाई केली होती, परंतु काही दिवसानंतरच ‘जैसे थे’ स्थिती आहे. आज स्वच्छता केली तर दुसऱ्या दिवशी भंडाराचे रस्ते पुन्हा कचऱ्याने माखू लागतात. दिवाळीचा सणानंतर स्वच्छता झाली खरी मात्र फटाक्यांचा कचरा जाळण्यात आला किंवा कुठे नालीत ढकलण्यात आला. काही ठिकाणी इमानेइतबारे फटाक्यांचा केरकचरा उचलण्यातही आला. शहरातील मुख्य रस्त्यांवर स्थिती आजही बदललेली नाही.
दुकानदार रस्त्याच्या कडेला कचरा गोळा करून ठेवतात. जिल्हाधिकारी चौकापासून ते शास्त्रीनगर चौकापर्यंत आणि महात्मा गांधी चौकापासून तर जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यांवर कचरा दिसणे ही ‘आम बात’ झाली आहे. याचे कुणालाही सोयरसुतक वाटत नाही. नागरिकांच्या असहकार्यामुळे पालिका प्रशासन कितीही प्रयत्न करित असले तरी या प्रयत्नांना यश लाभत नाही, ही सत्य स्थिती आहे.
सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावर किती कचरा साचलेला आहे याची कल्पनाच येत नाही. भंडारा शहरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसतात. ही बाब भंडारावासीयासांठी लाजीरवाणी आहे.
रस्त्यावर विखुरेला कचरा आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढिगारे पाहून शहर कचऱ्यात हरविल्याचा भास होत आहे. कचऱ्याची कोंडी आपल्याकडूनच केली जात आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. किमान आपल्या दुकानासमोर तरी कचरा राहू नये म्हणून त्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याची तसदी घेताना कोणीही दिसत नाही.
विशेष म्हणजे वस्ती असलेल्या ठिकाणी स्वच्छतेची हमी खुद्द नागरिकांनीच घ्यायला हवी तरच पालीकेच्या प्रयत्नांना यश मिळेल. घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने होत नसल्याने मानवीय आरोग्य भविष्यात धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहजिकच यासाठी प्रशासन व नागरिकांनी एकत्रीतपणे कार्य करणे गरजेचे आहे. सध्यातरी निवडणुकीपर्यंत शहराची स्वच्छता रामभरोसे आहे, असेच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)
नगरसेवक गेले वारीला
पवनी : ज्या क्षणाची विद्यमान नगरसेवक आतुरतेने प्रतिक्षा करित होते तो क्षण अखेर आला आणि नगरसेवक वारीला निघाले . विधान परिषदेची निवडणूक म्हणजे नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांसाठी पर्वणी असते . नगरातील नगरसेवक सहकुटूंब मतदानपूर्व वारीला गेल्याची चर्चा नगरात होवू लागली आहे. मात्र नगरातील कित्येक समस्या आवासून उभ्या आहेत .
विधान परिषद निवडणुकीत तीन दिग्गज उमेदवार उभे असल्याने मतदारांना चांगले दिवस आलेले आहेत. बोली सुरू झाल्याची चर्चा असून उमेदवारांनी मतदारांना उचलून वारीला नेणे सुरु केलेले आहे. पवनी पालिकेच्या सात नगरसेवकांचे निलंबनाचे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे.
न्यायालयाच्या निर्णयाची तंबी देवून सत्ताधारी पक्षाने पवनीतील मुरब्बी राजकारणी व्यक्तीला हाताशी धरले आहे. दुसरीकडे नगरात नागरिकांना पुरेसा व वेळेवर पाणीपुरवठा होवू शकत नाही. जागोजागी गावात कचरा पडून आहे . खांबावरील विद्यूत दिवे बंद पडलेले आहेत . ह्या सम्स्या दुर्लक्षीत करून नगरसेवक स्वहितासाठी वारीला निघालेले आहेत, हीच खरी वस्तुस्थिती पवनीत चर्चेचा विषय ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)