मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: June 10, 2017 12:20 AM2017-06-10T00:20:28+5:302017-06-10T00:20:28+5:30
पवनी पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या चाळीतील एका मोबाईल शॉपीमध्ये चोरी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पवनीतील फोडले होते मोबाईल शॉपी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पवनी पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या चाळीतील एका मोबाईल शॉपीमध्ये चोरी करण्यात आली. या चोरीतील तीन अट्टल चोरट्यांना चोरलेल्या मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
दिलीप राजधन जगने (२३), अमरनगर हिंगणारोड परिसर नागपूर, विशाल मनोहर उके (३३) कुंभारे कॉलोनी कामठी, रितेश उर्फ बबलू मोरेश्वर टेंभूर्णे (३०) रा. गोसेखुर्द असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
पवनी येथील घोडेघाट वॉर्डातील शिवाजी चौकात विजेंद्र काटेखाये यांची राम मोबाईल शॉपी आहे. १ जूनच्या मध्यरात्री दुकानाचे लोखंडी शटर वाकून चोरी करण्यात आली. यावेळी चोरट्यांनी ८० हजार ६५० रूपये किंमतीची १७ मोबाईल चोरून नेले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेल्या तपासाअंती त्यांनी जिल्ह्याचे अभिलेख तपासून सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली. सोबतच सायबरसेलने दिलेल्या तांत्रिक विश्लेषनामुळे दिलीप जगने याला ताब्यात घेवून विचारपूस केली. यावेळी त्याने दिलेल्या माहितीवरून विशाल उके व बबलू टेंभूर्णे यांनाही ताब्यात घेतले.
या तिघांकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस कर्मचारी सुधीर मडामे, सावंत जाधव, रोषन गजभिये, स्रेहल गजभिये, कौशीक गजभिये आदींनी केली.