तीन वाघ, दोन बिबटांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:55 AM2019-07-06T00:55:03+5:302019-07-06T00:55:40+5:30
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत बारा शिकाºयांना अटक करण्यात आली असून चौघांना न्यायालयीन कोठडी तर आठ जण कोठडीत आहे.
शिकार केलेल्या रानडुकराचे मांस एका घरी शिजत असल्याच्या माहितीवरून वनविभागाने धाड मारली. तेव्हा वाघाची शिकार झाल्याचे पुढे आले. वनविभागाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. या प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली आहे. यात मनीराम आनंदराम गंगबोयर, शिवमदन कुंभरे, रोहित नरसिंग भत्ता सर्व रा. सीतासावंगी, विजय सुंदरलाल पारधी रा. गुढरी, रविंद्र किसन रहांगडाले रा. गोबरवाही, चमरू ताराचंद कोहळे रा. राजापूर, अनिल ठाकूर, नरेंद्र गजानन पटले, विजय पारधी आणि रविंद्र रहांगडाले यांच्यासह बारा जणांचा समावेश आहे. या सर्वांची वन कोठडी घेतली असता त्यांनी आतापर्यंत त्यांनी तब्बल तीन वाघांची शिकार केल्याची पुढे आले. तसेच दोन बिबटही मारल्याचे तपासात दिसून येत आहे. यासोबतच शेकडो रानडुक्कर आणि चितळाचीही शिकार केली.
वनविभाग या टोळीच्या मोरक्याचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशात तळ ठोकून आहे. अद्यापपर्यंत मध्यप्रदेशातील शिकारी वनविभागच्या हाती लागले नाही. दरम्यान शिकाºयांची वन कोठडी संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी आठ जणांना तीन दिवसाची वनकोठडी देण्यात आली. तर अनिल ठाकूर, नरेंद्र पटले, विजय पारधी, रविंद्र रहांगडाले यांना १९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनात सहायक उपवनसंरक्षक प्रितम कोडापे, नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्रधिकारी नितेश धनविजय करीत आहेत. या टोळीने तीन वाघांची शिकार केल्याचे पुढे आल्याने वनविभाग कसून तपास घेत आहे. त्यांनी वाघाचे अवयव नेमके कुणाला आणि कशापद्धतीने विकले याचा तपास घेतला जात आहे.
मध्यप्रदेशावर लक्ष केंद्रित
रानडुकराच्या शिकारीतून वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले. एक नव्हे तब्बल तीन वाघांची शिकार झाल्याचे पुढे आहे. स्थानिक शिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघाची शिकार करू शकत नाही. यात आंतरराज्यीय तस्करांचा समावेश असण्याचा दाट संशय वनविभागाला आहे. त्यामुळे वनविभागचे एक पथक गेल्या चार दिवसांपासून मध्यप्रदेशात तळ ठोकून आहे. अद्यापर्यंत शिकारी त्यांच्या ताब्यात आले नाहीत. सखोल तपास झाल्यास मोठी टोळी हाती येऊ शकते.