रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:00+5:302021-05-31T04:26:00+5:30
तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने उपविभागीय अधिकारी नष्टे यांनी मोहीम सुरू केली आहे. ...
तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने उपविभागीय अधिकारी नष्टे यांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे. यात, बुधवारी (दि. २६) सकाळी ११.३० वाजता चांदोरी बु. रेती घाटात १ ब्रास रेतीची विनापरवाना अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एआर ०५३० ला पथकाने पकडले. राजू किसन ठाकरे (रा. चांदोरी बु) असे वाहन मालकाचे नाव आहे. तसेच गुरुवारी (दि. २७) सायंकाळी ६.३० वाजता पथक नवेझरी परिसरात गस्तीवर असताना दाेन ट्रॅक्टर रेती भरून मुरमाडी-मुरपार मार्गावरून येत असल्याचे दिसले. पथकाने ट्रॅक्टर थांबवून रेती वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र आपल्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले. त्यावरून ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६-०४९८ व ट्राॅली क्रमांक एमएच ३५-एफ २२१७ ने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या मोहनलाल टिकाराम बोंद्रे (रा. निलज खु.) व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी १०६८ ने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या नितीन वामन चकोले (रा. नवेगाव) यांच्यावर कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सर्व जप्त ट्रॅक्टर्स तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी नष्टे व तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी प्रवीण रोकडे, तलाठी उगावकर, आनंद भूते, संजय वाकलकर यांनी केली.