आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:30 PM2018-07-21T21:30:58+5:302018-07-21T21:31:16+5:30
गोंडउमरी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराचे अतिरिक्त प्रथम सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी सचिन पुंडलीक चांदेवार (२१) रा.गोंडउमरी याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोंडउमरी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराचे अतिरिक्त प्रथम सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी सचिन पुंडलीक चांदेवार (२१) रा.गोंडउमरी याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत असे की, अल्पवयीन पीडित मुलीची आई व वडील घटनेच्या एक महिन्यापासून मजूरी कामाने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे मुलगी व तिच्या दोन बहिणी काकाकडे राहत होते. १६ डिसेंबर २०१४ रोजी रात्रीला जेवण केल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास मुलगी घरासमोरील अंगणात लघुशंकेसाठी निघाली होती. दरम्यान गावातीलच सचिन पुंडलीक चांदेवार याने मुलीचा विनयभंग केला. मुलीने प्रतिकार करून आरडाओरड केली असता सचिन हा घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेची माहिती काका व काकूला सांगितली. त्यानंतर साकोली पोलीस ठाण्यातून घटनेसंबंधी तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी सचिन पुंडलीक चांदेवार याच्याविरुद्ध भादंवि ३५४ अ तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ नुसार सहकलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला.
सचिन चांदेवार याला अटक करून साकोली पोलिसांनी घटनेचा तपास केला. तपासानंतर पोलिसांनी सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे दोषारोपण केले. न्यायालयाने साक्ष पुरावाच्या तपासाअंती सचिन चांदेवार याला शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.दुर्गा तलमले यांनी युक्तिवाद केला.