मान्सून जिल्ह्याच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:01:11+5:30
रोहिणीत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर सातत्याने मृगसरी बरसल्या. त्यामुळे शिवारात आता पेरणी सुरू झाली आहे. हवामान विभागानेही १२ ते १५ जूनदरम्यान दमदार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. वर्धा जिल्ह्यापर्यंत मान्सून पोहोचला व आता रविवारी जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकरी चातकासारखी वाट पाहत असलेला मान्सून जिल्हा सीमेपर्यंत आल्याची सुखद वार्ता हवामान विभागाने शनिवारी दिली. तत्पूर्वी, या आठवड्यात कोसळलेल्या मृगसरींनी पेरणीपूर्व कामाची लगबग शिवारात सुरू झाली व शनिवारपासून पेरण्यांनाही वेग आलेला आहे.
रोहिणीत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर सातत्याने मृगसरी बरसल्या. त्यामुळे शिवारात आता पेरणी सुरू झाली आहे. हवामान विभागानेही १२ ते १५ जूनदरम्यान दमदार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. वर्धा जिल्ह्यापर्यंत मान्सून पोहोचला व आता रविवारी जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
नैऋत्य मान्सून थोडा पुढे सरकला व त्याने कोकणातील हरणई, सोलापूर कोल्हापूर, मराठवाड्याचा काही भाग, वर्धा, ब्रम्हपुरी आदी भाग व्यापलेला आहे. येत्या काही तासांत तो विदर्भात पोहोचण्याची शक्यता आहे. विदर्भात मान्सूनचे आगमन १४ व १५ जून रोजी घोषित होईल, अशी अपेक्षा आहे. पूर्व बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीवर ७.६ किमी उंचावर चक्राकार वारे आहेत. सोबतच कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिम-उत्तर दिशेने होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भात पुढील दोन दिवस कमी-जास्त प्रमाणात सार्वत्रिक पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
बंगालचा उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात होत असलेला पाऊस रविवारी व सोमवारी नैऋत्य मान्सूनमध्ये मिसळून जाण्याची शक्यता आहे. रविवारपर्यंत मान्सूनचे वारे मुंबईत पोहोचून नंतर गुजरातकडे रवाना होण्याची शक्यता जास्त आह. परंतु, तेलंगणा मार्गे येणाऱ्या मान्सून वाºयापासून विदर्भात कमी-जास्त प्रमाणात पाऊस सुरूच राहणार असल्याचे बंड यांनी सांगितले.
जिल्ह्याची हवामान सद्यस्थिती
मध्य प्रदेश आणि उत्तर कोकणाच्या १.५ किमी उंचीवर चक्राकार वारे व हरियाणा ते बंगालच्या उपसागरामार्गे उत्तर मध्य प्रदेश, छत्तीसगड या प्रदेशावर कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय) आहे. त्यामुळे १४ जूनला विदर्भात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर मोजक्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. १५ जूनला विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. १६ ते २० दरम्यान मध्य भारतात तसेच विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असल्याचे अनिल बंड यांनी सांगितले.
जिल्ह्यात सरासरी ८१.३ मिमी पाऊस
जिल्ह्यात १ जूनपासून पावसाची नोंद घेण्यात येते. तेव्हापासून ६३.३ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ८१,३ मिमी नोंद १३ दिवसांच्या कालावधीत झाली आहे, २४ तासांत १३.६ मिमी पाऊस कोसळला. १ जूनपासून अमरावती तालुक्यात ८३.८ मिमी, भातकुली ५३.९ मिमी, नांदगाव खंडेश्वर ८३.८ मिमी, चांदूर रेल्वे १४६.२ मिमी, धामणगाव रेल्व ९३.५ मिमी, तिवसा ६२.६ मिमी, मोर्शी १२९.८ मिमी, वरुड ९० मिमी, अचलपूर ५९.७ मिमी, चांदूर बाजार ८४.६ मिमी, दर्यापूर ३७.१ मिमी, अंजनगाव सुर्जी ४३.४ मिमी, धारणी ७५.३ मिमी व चिखलदरा तालुक्यात ९४.९ मिमी पाऊस झाला.