थरार! रानडुक्कर अचानक शिरले घरात अन् घरच्यांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 04:25 PM2022-05-12T16:25:53+5:302022-05-12T18:36:40+5:30

हा थरार मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथे बुधवारी रात्र नागरिकांनी अनुभवला.

Thrill! The wild boar entered the house and stayed out all night | थरार! रानडुक्कर अचानक शिरले घरात अन् घरच्यांची पळापळ

थरार! रानडुक्कर अचानक शिरले घरात अन् घरच्यांची पळापळ

googlenewsNext
ठळक मुद्देचार तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद

भंडारा : रात्री घरातील मंडळी ओसरीत जेवण करीत होती. जंगलातून एक रानडुक्कर सुसाट वेगाने आले अन् थेट घरात शिरले. आरडाओरडा होताच गावकरी गोळा झाले. रानडुकराला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, घाबरलेले रानडुक्कर घराबाहेर निघेना. घरातील साहित्याची त्याने नासधूस सुरू केली. अखेर वन विभागाला पाचारण करण्यात आले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर रानडुकराला जेरबंद करण्यात आले. हा थरार मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथे बुधवारी रात्र नागरिकांनी अनुभवला.

कोका वन्यजीव अभयारण्यालगत ढिवरवाडा गाव आहे. संदीप वनवे नेहमीप्रमाणे आपल्या परिवारासह घराच्या ओसरीत बुधवारी रात्री ८ वाजता जेवण करत होते. जंगलातून भरकटलेले रानडुक्कर गावात शिरले. रानडुकराला पाहताच श्वान त्याच्या मागे लागले. घाबरलेले रानडुक्कर थेट संदीप वनवे यांच्या घरात शिरले. घाबरून घरातील मंडळींनी हातचे जेवण सोडून दिले. रानडुकरापासून बचाव करण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्या घरासमोर गोळा झाले. रानडुकराला हुसकावून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला; परंतु घाबरलेले रानडुक्कर घराबाहेर निघेना. नागरिकांच्या आवाजाने घरातच गोंधळ घालू लागले. त्याने घरातील साहित्याची नासधूस सुरू केली.

अखेर नागरिकांनी घराचा दरवाजा लावून घेतला. या प्रकाराची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद लुचे, क्षेत्र सहाय्यक ए.वाय. शेख, पालोरा बीटचे वनरक्षक माेहन हाके, अभयारण्याचे वनरक्षक नीलेश कळंबे, चवरे यांच्यासह कोका अभयारण्याचे प्राणी बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. घराच्या चारही बाजूंना जाळे लावण्यात आले; परंतु रानडुक्कर काही केल्या घराबाहेर निघेना. अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रानडुक्कर जाळ्यात आले. त्याला जेरबंद करून वाहनात नेत असताना त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद लुचे यांनी त्यास करकचून पकडले आणि रात्री २ वाजता जंगलात सोडले.

वन अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

चार तास चाललेल्या प्रयत्नांत रानडुकराने घरात घिरट्या घालून जीवनावश्यक साहित्याची नासधूस केली, तसेच गावात शिरणाऱ्या वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांच्या वाहनास घेराव घातला. संदीप वनवे यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांचा रोष लक्षात घेता वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद लुचे यांनी पंचनामा करून तातडीचे आश्वासन दिल्याने रस्ता मोकळा करण्यात आला.

Web Title: Thrill! The wild boar entered the house and stayed out all night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.