फेकलेली औषधे पशूंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:16 AM2017-07-25T00:16:50+5:302017-07-25T00:16:50+5:30
तुमसर-रामटेक मार्गावरील खापा शिवारात रस्त्याशेजारील फेकलेली हजारो रुपयांची औषधी पशूंची असल्याची बाब उघडकीस आली आहे.
पशूसंवर्धन विभाग जागा : औषधांचा पंचनामा, पशू रुग्णालयाचा रेकॉर्ड मागितला
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-रामटेक मार्गावरील खापा शिवारात रस्त्याशेजारील फेकलेली हजारो रुपयांची औषधी पशूंची असल्याची बाब उघडकीस आली आहे. सोमवारी लोकमतमध्ये ‘रस्त्याशेजारी फेकली हजारो रुपयांची औषधी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यावर पशूसंवर्धन तथा आरोग्य विभाग खळबळून जागे झाले. फेकलेली औषधे पशंूची असल्याचे माहिती समोर आली आहे. सोमवारी पशूसंवर्धन व सामान्य आरोगय विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देवून पाहणी केली
तुमसर- रामटेक राज्य मार्गावरील खापा (तु) शिवारात शासकीय पुरवठ्याची पशूंची औषधे फेकली आहेत. सोमवारी तुमसर पंचायत समितीअंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. ए. कुरैशी यांनी भेट दिली. त्यांनी चौकशी व तपासणी केल्यावर फेकलेली औषधे पशंूची असल्याचे सांगितले. पशूसंवर्धन विभागाला शासनाकडून दरवर्षी औषधांचा पुरवठा केला जातो. पशूंना ही औषधे निश्चितच दिली जातात. तुमसर शहर व तालुक्यात पशु रुग्णालये राज्य शासन व जिल्हा परिषदेमार्फत सुरु आहेत. फेकलेली पशूंची औषधे पशूंना देण्यात आली नाही, असे दिसून येते.
फेकलेली औषधी काही कालबाह्य झाली असून काही औषधी कालबाह्य झालेली नाही असे समजते. संबंधित औषधी कुणाची आहेत. (रुग्णालयाची) याची माहिती अद्याप कळू शकली नाही. औषधाचा साठ्यावरुन नेमकी माहिती येथे कळू शकेल. औषधाच्या बॅच क्रमांकावरुन नेमकी औषधे कोणत्या पशू रुग्णालयाची आहेत याची माहिती प्राप्त करता येते. सोमवारी तुमसर येथील पशु संबंधीत आरोग्य उप सहसंचालक डॉ. विवेक इटनकर यांनी भेट देऊन औषधांचा पंचनामा केला. तालुका पशु संवर्धन अधिकारी डॉ. भास्कर चोपकर यांनीही भेट देऊन पाहणी केली.
तुमसर तालुक्यात राज्य शासन व जिल्हा परिषदेचे १२ ते १३ पशु रुग्णालये आहेत. खापा शिवार मोहाडी तालुक्याच्या सीमेवर असल्याने ही औषधी नेमकी कोणत्या पशू रुग्णालयाची आहे. त्याचा शोध घेण्याची गरज आहे. औषधांवर नॉट फॉर सेल, फॉर गव्हर्नमेंट सप्लाय. असे नमूद असल्याने घडलेला प्रकार फार गंभीर आहे. सर्व सामान्यांच्या पशूंकरिता शासन कोट्यावधीची औषधी पाठविते व त्यांची विल्हेवाट फेकण्याने करण्यात येते ही गंभीर तितकाच संतापजनक प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.
खापा शिवारात फेकलेली पशूंची औषधींचे निरीक्षण करुन पाहणी केली. नेमकी ही औषधी कुणाची आहे याची चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर सविस्तर सांगता येईल.
डॉ. विवेक ईटनकर, प्रभारी उपसहसंचालक राज्य पशूसंवर्धन विभाग, तुमसर
खापा शिवारातील फेकलेली औषधांचे बॅचेस जिल्हा परिषदेच्या पशू रुग्णालयातील साठा एका वर्षापूर्वीच संपला आहे. तुमसर तालुक्यातील सर्वच पशूसंवर्धन रुग्णालयातील रेकॉर्ड तपासणीकरिता बोलविला आहे. नेमके कुठले औषध आहे ते त्यातून कळेल
डॉ. भास्कर चोपकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, पंचायत समिती तुमसर