ई पॉस मशीनवर स्वस्त धान्य दुकानदारांचाच अंगठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:16 AM2021-05-04T04:16:24+5:302021-05-04T04:16:24+5:30
भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकाच्या अनुषंगाने स्वस्त धान्य देण्यात येते. यात प्रत्येक लाभार्थ्यांच्या अंगठा ई पॉस ...
भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकाच्या अनुषंगाने स्वस्त धान्य देण्यात येते. यात प्रत्येक लाभार्थ्यांच्या अंगठा ई पॉस मशीनवर घेणे बंधनकारक होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ई पॉस मशीनवर फक्त स्वस्त धान्य दुकानदारांना अंगठा लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बंद पुकारल्याने गत चार दिवसांपासून धान्याचे वितरण ठप्प आहे. यात भंडारा जिल्ह्यातील हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाने घोषित केल्या प्रमाणे नि:शुल्क अन्नधान्य अजूनपर्यंत धान्य दुकानदारापर्यंत पोहोचलेले नाही. परिणामी आता पुन्हा एकदा संचारबंदीच्या काळात रेशनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच आर्थिक चणचण वाटत असताना अन्नधान्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. यावर चोहोबाजूने फक्त गरीब व गरजू लाभार्थी भरडला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बॉक्स
अशी आहेत स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या
राज्यात ५२ हजारांपेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकाने असून भंडारा जिल्ह्यात ८८० स्वस्त धान्य दुकाने आहेत. यातूनच जिल्ह्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण केले जाते. मात्र या स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांना घेऊन १ मेपासून स्वस्त धान्य वाटप बंद केले आहे. दुकानदारांच्या मागणी अंतर्गत ५० लाखांचा कोविड योद्ध्यांचा विमा कवच व अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली कमिशन तातडीने देण्याची मागणी करीत या दुकानदारांनी धान्य वितरण बंद केले आहे. या सोबतच अन्य मागण्यांचाही समावेश आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिकाही स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने घेतली आहे.
बॉक्स
रेशन दुकानात सॅनिटायझर
स्वस्त धान्य वितरण प्रणालींतर्गत राज्य शासनाने घोषित घोषणा केल्याप्रमाणे गरीब व गरजू लोकांना धान्याचे वाटप केले जाणार आहे. यात ई पॉस मशीनवर अंगठा लावण्यात येणार नसला तरी दुकानात सॅनिटायझर असणे गरजेचे आहे. जेणेकरून वरून संसर्गापासून बचाव होऊ शकेल. तसेच दुकानात एकाच वेळी गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे निर्देशही शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
बॉक्स
स्थानिक पातळीवरच्या मागण्या
तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर शिधापत्रिकाधारक धान्य मागायला येत असेल तर त्याचा अंगठा ई पॉस मशीनवर घ्यावा, असे शासनाने बजावले आहे. मात्र यावरही स्वस्त धान्य संघटनेने आक्षेप घेतला असून ही अट रद्द करावी. जेणेकरून लाभार्थ्याला त्याच्या हक्काचे धान्य देता येईल. मात्र याबाबत अजूनपर्यंत निर्णय न झाल्याचे समजते.
बॉक्स
लाभार्थ्यांची गैरसोय कायम
जिल्ह्यात एक मेपासून धान्य वाटप बंद असल्याने दररोज शेकडो लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात येऊन आल्या पावली परत जात आहेत. धान्य मिळत नसेल तर खायचे काय, असा सवालही आता लाभार्थी विचारत आहेत. राज्य शासनाने लवकर निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा, अशी मागणीही लाभार्थी करीत आहेत.
बॉक्स
संचारबंदी काळात नि:शुल्क धान्य मिळेल, अशी घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत धान्यच स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहोचले नाही तर वाटप कुठून करायचे, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. संचारबंदी घोषित होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.