धावत्या दुचाकीवर वाघाने घातली झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:59+5:302021-05-05T04:57:59+5:30
गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात (दि. १) सायंकाळी ७ च्या सुमारास प्रवास करीत असलेल्या दुचाकीस्वार ...
गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात (दि. १) सायंकाळी ७ च्या सुमारास प्रवास करीत असलेल्या दुचाकीस्वार दोघांवर अचानक वाघाने झडप घातली. दरम्यान, दुचाकीस्वार दोघेजण वाघाच्या हल्ल्यामुळे गाडीवरून खाली पडले, तर दुसरीकडे वाहनाच्या प्रकाशामुळे वाघाने रस्त्याकडेला दडी मारली. हा थरार मार्गाने जात असलेल्या चारचाकी वाहनचालकांनी प्रत्यक्ष अनुभवला. दरम्यान, एका चारचाकीचालकाने आपले वाहन थांबवून दुचाकीस्वारांना सहारा दिल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले.
रंजित परशुरामकर (वय ३५), दानेश गहाणे (४०, दोन्ही रा. खाडीपार) अशी दुचाकीस्वारांची नावे आहेत. खाडीपार येथील रंजित परशुरामकर व दानेश गहाणे हे दोघे दुचाकीने गोरेगावकडून डव्वाकडे जात होते.
रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मुंडीपार ते मुरदोली या दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या जंगल शिवारात अचानक रस्त्याच्या एका बाजूने वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला चढविला. वाघाच्या हल्यात दोघे दुचाकीस्वार खाली पडले, तर दुसरीकडे रस्त्याने जात असलेल्या चारचाकी वाहनाच्या प्रकाशामुळे वाघाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दडी मारली. हा सर्व प्रकार दुचाकीस्वारांच्या मागे चारचाकी वाहनाने जात असलेले माजी जि. प. सदस्य राजू चांदेवार व त्यांच्या चालकाने प्रत्यक्ष अनुभवला. दरम्यान, दोन्ही युवकांना वाचविण्याच्या अनुषंगाने जीवाची कसलीही पर्वा न करता चांदेवार यांनी दुचाकीस्वारांना उचलले. त्यातच त्यांची विचारपूस करीत असतानाच तो वाघ इतरत्र नसून, रस्त्याच्या बाजूलाच असल्याचे सांगितले.
दोन्ही दुचाकीस्वारांना चारचाकी वाहनात घेऊन घटनास्थळावरून ते रवाना झाले. काही अंतरावर असलेल्या मुरदोली गावशिवारात जाऊन दोन्ही दुचाकीस्वारांची विचारपूस केली असता, ते दोन्ही किरकोळ जखमी असल्याचे समोर आले. राजू चांदेवार यांच्यामुळे त्या दोघांचे प्राण वाचले.