मिरचीच्या शेतात वाघाचा ठिय्या, नागरिकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:41 PM2023-01-18T12:41:26+5:302023-01-18T12:41:46+5:30
उपवनसंरक्षकांसह वनविभागचे पथकही दाखल झाले असून वाघाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
शिराज शेख
मोहाडी (भंडारा) : मिरचीच्या शेतात पट्टेदार वाघ ठिय्या मांडून असल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे बुधवारी सकाळी उघडकीस आला. गावाात या घटनेची माहिती होताच वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. उपवनसंरक्षकांसह वनविभागचे पथकही दाखल झाले असून वाघाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
मांडेसर येथील बालचंद दमाहे यांच्या मिरचीच्या शेतात बुधवारी सकाळी ७ वाजता गावातील एका व्यक्तीला वाघ दिसला. घाबरून जाऊन तो झाडावर चढला. तेथूनच त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून गावात पाठविला. हा प्रकार माहित होताच गावकऱ्यांनी शेतातकडे धाव घेतली. शेतातील एक झुडुपात वाघ दिसला. नागरिकांच्या गोंगाटापे वाघ झुडुपातून बाहेर निघाला. मात्र घाबरून दुसऱ्या झुडुपात लपला. याप्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांचा मोठा गोंगाट असल्याने वाघाला हुसकावून लावणे कठीण जात आहे. मोहाडी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले असून गावकरी मात्र तेथून हटायला तयार नाही. दुसरीकडे मिरचीचे संपूर्ण शेत गावकऱ्यांच्या पायाखाली तुडविले जावून नुकसान होत आहे.
गत पाच-सहा दिवसापासून या भागात वाघ असल्याची चर्चा आहे. या वाघाने वानर व रानडुकारची शिकार केल्याचे सांगितले जात आहे. मात्र बुधवारी प्रत्यक्ष वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मांडेसर शेतात वाघ असून आम्ही वाघाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतील आहे. मात्र गावकऱ्यांची गर्दी असल्याने वाघ घाबरून लपून बसला आहे. पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवून वाघाला शेतातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येतील
-राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा