धनेगाव शिवारात वाघाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:34 PM2017-12-16T23:34:14+5:302017-12-16T23:34:37+5:30
तुमसर तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात वाघाने ठाण मांडले आहे. शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाघाने रानडुकराची शिकार केली.
रंजित चिंचखेडे ।
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात वाघाने ठाण मांडले आहे. शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाघाने रानडुकराची शिकार केली. शिवारात वनविभाग व पोलिसांची चमू दाखल झाली आहे. वाघाच्या वास्तव्यामुळे परीसरात दहशत पसरली आहे.
चांदपूर संरक्षित जंगलात वन्यप्राण्यांच्या संख्येत निरंतर वाढ होत आहे. या जंगलात मध्यप्रदेशातून वाघांचे आगमन होत आहे. जंगलात वाघांची संख्या वाढत असल्याने वनविभागाचे कर्मचारी सतर्क झाले आहेत. या जंगलात वाघ आणि बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार आहे. सायंकाळ होताच वाघ आणि बिबटचे दर्शन होत आहे. शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास धनेगाव शिवारात बाबा तुरकर यांच्या शेतशिवारात धानाची मळणी सुरू होती.
यावेळी वाघाने रानडुकराची शिकार करताना मजुरांनी पाहिले. त्यानंतर आरडाओरड केल्याने वाघ नाल्याच्या दिशेने पळून गेला. शिकार केलेल्या जागेवर पुन्हा येऊन बसला. नागरिकांनी वाघाची माहिती वनविभागाच्या कर्मचाºयांना दिली. या वाघावर वन व पोलीस विभागाचे कर्मचारी नजर ठेवून आहेत. नाल्यालगतच्या शेतात वाघ बसून आहे. यामुळे सिहोरा परिसर आणि जंगलव्याप्त गावात वनविभागाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. सायंकाळ होताच स्वत: व जनावरांचे सुरक्षा करणारे उपाय योजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चार दिवसापूर्वी सुंदरटोला येथे एका महिलेवर वाघाने हल्ला केला होता. परंतु हे दोन्ही वाघ वेगवेगळे असल्याचे वनअधिकाºयांचे म्हणने आहे. एकाच जागेत ठाण मांडून असणारा हा वाघ आजारी असल्याचे सांगण्यात आले आहे. या वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नागरिकांच्या वाढत्या गर्दीने वाघाला ताब्यात घेण्यासाठी अडचणी येत असल्याचे वन अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
धनेगाव शेतशिवारात वाघाने ठाण मांडले आहे. सध्या वाघावर नजर ठेवण्यात आले असून या वाघांसंदर्भात पुढील निर्णय वरिष्ठ अधिकारीच घेतील.
- वाय.एन. साठवणे,
सहायक वनपरिक्षेत्राधिकारी हरदोली.