अभयारण्यात बछड्यांसह व्याघ्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:00 AM2020-12-17T05:00:00+5:302020-12-17T05:00:19+5:30
पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसिद्धी मिळाली होती. आशिया खंडातील अत्यंत देखणा वाघ म्हणून त्याची प्रसिद्धी होती. त्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलीब्रिटींनी या अभयारण्याला भेट दिली होती.
अशोक पारधी
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील जय वाघाच्या मृत्यूनंतर पर्यटकांनी पाठ फिरविली होती तर कोरोना संसर्गामुळे पर्यटकांना बंदी होती. आता या अभयारण्यात दोन बछड्यांसह एका वाघीणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. ऑनलाईन बुकींगलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसिद्धी मिळाली होती. आशिया खंडातील अत्यंत देखणा वाघ म्हणून त्याची प्रसिद्धी होती. त्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलीब्रिटींनी या अभयारण्याला भेट दिली होती. मात्र तो अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर जयचंद व राहीने पर्यटकांना आकर्षित केले. परंतु एक-एक करीत सर्व वाघ नाहिसे झाले आणि पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविली.
तर कोरोनाच्या संसर्गाने एप्रिल महिन्यापासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद होते. त्यामुळे अभयारण्याच्या महसुलात मोठी घट झाली. तसेच पर्यटनावर उपजिवीका करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दिवाळीनंतर पर्यटकांसाठी अभयारण्य खुले झाले. परंतु सुरुवातीच्या काळात पर्यटकांचा फारसा प्रतिसाद दिसत नव्हता. आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दोन बछड्यांसह एक वाघीण पर्यटकांना दर्शन देत आहे. अनेक पर्यटकांना या वाघीणीचे दर्शन झाले. अलीकडे पवनी गेटवरुन प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना या वाघीणीचे नित्यनेमाने दर्शन होत आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकींगही जोमाने सुरु आहे.
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य १८९ चौरस किलोमीटर परिसरात पसरले असुन पवनी गेट अंतर्गत ५० चौरस किलोमीटर क्षेत्र येथे या अभयारण्यात विविध पशू पक्षी असून निसर्गाची मुक्त हस्ते उधळण आहे. वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांसाठी पवनी गेट आकर्षणाचे केंद्र असते. मात्र पवनी गेटवर पर्यटकांसाठी फारशा सुविधा नाहीत. येथे केवळ बुकींग ऑफीस आणि विश्रांतीगृह आहे. त्याठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्याची खरी गरज आहे.
पवनी गेटला पर्यटकांची पसंती
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी गेटकडून जाणाऱ्या पर्यटकांना व्याघ्र दर्शन झाल्याने पर्यटकांची या गेटवरुन भ्रमंतीसाठी पहिली पसंती दिसत आहे. पवनी गेटवर बुकींग ऑफीस पर्यटकांसाठी विश्रांतीगृहाची सुविधा आहे. तसेच तेथे पर्यटनासाठी जीप्सीही उपलब्ध असते. दिवाळीच्या काळात एका पर्यटकाला बछड्यासह वाघीणीचे दर्शन झाले. या वाघीणीचा संचार कोरंभी, खापरी, पाहुणगाव या परिसरात दिसून आला. अलीकडे या वाघीणीचे अनेकांना दर्शन होत असल्याने पर्यटक पवनी गेटमधून प्रवेश करण्यासाठी उत्सूक असतात. पर्यटकांसाठी येथे आणखी सुविधा निर्माण केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्यातून रोजगाराची समस्याही सुटेल.
अभयारण्यात भ्रमंती करताना पर्यटकांनी वनविभागाच्या सर्व नियमांचे पालन करावे. वन्यजीवांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये. वनभ्रमंतीत जीप्सीमधुन खाली उतरु नये. प्लास्टीकसह इतर साहित्य जंगलात फेकू नये.
- आर.एम. घाडगे,
वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)