वाघाच्या हल्ल्यात बैल ठार
By admin | Published: January 31, 2015 12:31 AM2015-01-31T00:31:22+5:302015-01-31T00:31:22+5:30
सिरसाळा गावाजवळ वाघाने एका बैलावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. सिंदपूरी व कोदुर्ली गावाजवळील शेतशिवारात दिवसाढवळ्या बिबट्या दिसत असल्याने या बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे.
पवनी : सिरसाळा गावाजवळ वाघाने एका बैलावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. सिंदपूरी व कोदुर्ली गावाजवळील शेतशिवारात दिवसाढवळ्या बिबट्या दिसत असल्याने या बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. पाच किलोमिटर अंतरावरील सिरसाळा गावाच्या आजुबाजुने घनदाट जंगल आहे. त्यामुळे येथे नेहमी वन्यप्राण्यांचा संचार असतो. काल, गुरुवारी सकाळी एका बैलावर वाघाने हल्ला करुन त्याला ठार केले. या बैलाची किंमत जवळपास तिस ते चाळीस हजार रुपये आहे. वनविभाग चौकशी करीत आहे.
पवनी-गोसीखुर्द रस्त्यावरील सिंदपुरी ते ईटगावच्यामध्ये असलेल्या शेताजवळ काही दिवसापासून एक मादी बिबट मुक्कामाला आहे. या परिसरात ही मादी बिबट दोन पिल्यांसोबत फिरताना अनेकांनी पाहिले. शेतामध्ये असलेल्या उसात व जवळच असणाऱ्या नाल्याजवळ हे बिबट्याचे कुटूंब सध्या वास्तव्य आहे. हा रस्ता रात्री उशिरापर्यंत नेहमी वर्दळीचा राहत असल्यामुळे या बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे अंधार पडण्यापुर्वीच शेतकरी आपल्या घरी परततात.
कोदुर्ली गावाजवळ वैनगंगा नदीच्या जवळील शेतामध्ये एक बिबट नेहमी वास्तव्यास असतो. हा बिबट काल दिवसा दुपारी गावातील महिलांना दृष्टीस पडला हा बिबट रात्रीच्या वेळेस अनेक वेळा गावात ही आला आहे. या बिबट्याने नदीपलीकडे जुनोना गावात जावून बछड्याला दोन दिवसापुर्वी ठार केले. या बिबट्याने या भागात चांगलीच दहशत निर्माण केल्याने सर्व लोक अंधार पडण्यापुर्वी आपल्या घरी परततात. (शहर प्रतिनिधी)