सिहोरा परिसरात वाघांची दहशत
By admin | Published: October 21, 2016 12:37 AM2016-10-21T00:37:42+5:302016-10-21T00:37:42+5:30
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ परिसरात वाघाची दहशत कायम आहे. टेमनी शिवारात वाघाने पुन्हा बैल ठार केले.
सोंड्याशिवारात बैल ठार : महिनाभरात चार जनावरे फस्त
चुल्हाड (सिहोरा) : ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ परिसरात वाघाची दहशत कायम आहे. टेमनी शिवारात वाघाने पुन्हा बैल ठार केले. महिनाभरात चार जनावरे ठार केल्यामुळे वनविभागाची यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सिहोरा परिसरात वनविभागात राखीव वनक्षेत्र आहे. या जंगलात वाघाने बस्तान मांडले असून जंगलाशेजारच्या गावात वाघाची दहशत आहे. मुरली, सोनेगाव आणि टेमनी गावाशेजारी असणाऱ्या जंगलात वाघाने शेतकऱ्यांची जनावरे फस्त केली. या आठवड्यात सोंड्या येथील शेतकरी हरिश्चंद्र लंजे यांच्या मालकीच्या बैलाला ठार केले. टेमनी शिवारात लंजे यांचा बैल ठार केल्यानंतर वाघाने याच जंगलात सुदाम गौपाले यांच्या बैलाला ठार केले. सोंड्या शिवारातही याच वाघाने बैलाला ठार केले.
चांदपूर पर्यटन स्थळाच्या राखीव जंगलात वाघ व त्याच्या दोन छाव्यांची भ्रमंती सुरू आहे. यामुळे जंगलात भ्रमंती व प्रवेश करणाऱ्या प्रेमीयुगुल तथा नागरिकांवर बंदी घालण्यात आली आहे. मागील काही महिन्यापासून या जंगलात वाघाने जनावरे ठार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. दरम्यान वाघाने जनावरे ठार करणे सुरू केल्यामुळे वनविभागाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. जंगल शेजारी असलेल्या गावात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आलेली आहे.
बपेरा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत राखीव जंगल परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आंतरराज्यीज तपासणी नाका अत्याधुनिक करण्याची मागणी होत आहे.कार्यरत कर्मचारी जंगलात वन्यप्राण्यांचे संवर्धन सेवेत कर्तव्य बजावत आहे. यामुळे सहाय्यक वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयातील कामे प्रभावित होत आहेत. कामाचा व्याप असल्याने कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)
प्रकल्पाचे सुरक्षारक्षक दहशतीत
सोंड्या शिवारातील राखीव जंगलाशेजारी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आहे. दोन दिवसांपूर्वी ६० लाखांची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडीत केला आहे. संपूर्ण प्रकल्पस्थळात अंधार पसरलेला आहे. रात्री प्रकल्पस्थळी ३ सुरक्षारक्षक अंधारात पहारा देत आहेत. घनदाट जंगलाशेजारी असणाऱ्या या प्रकल्पात दिव्यांची सुविधा नाही. प्रकल्पाची सुरक्षा करणाऱ्या रक्षकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकल्प परिसरात वाघ, बिबट यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा वावर राहत असल्यामुळे सुरक्षारक्षक दहशतीत पहारा देत आहेत.
धरणाचा मार्ग बंद करा
मध्यप्रदेश राज्याला जोडणारा धरणाचा मार्ग वाहतुकीस २४ तास खुला ठेवण्यात येत आहे. असामाजिक तत्व व शिकाऱ्यांसाठी हा मार्ग सोयीचा ठरत आहे. या परिसरात शिकार करून या मार्गाने पळून जाण्यासाठी या मार्गाचा ते वापर करीत आहेत. जंगलात वाघांचे बस्तान असल्यामुळे या जंगलाकडे शिकाऱ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. यामुळे दिवसभर सुरु ठेवण्यात येणारा धरण मार्ग रात्री बंद ठेवण्याची मागणी होत आहे.