लग्नसमारंभात नियमांना तिलांजली; दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:24 AM2021-06-28T04:24:04+5:302021-06-28T04:24:04+5:30
भंडारा : कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही तर दुसरीकडे नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत ...
भंडारा : कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही तर दुसरीकडे नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा तालुक्यातील एका सभागृहात लग्नसमारंभात कोरोना नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येताच तहसीलदार व महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करीत आयोजकांवर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई शनिवारी ठाणा येथील बावनकुळे सभागृहात करण्यात आली.
ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दुसऱ्या लाटेत आढळून आले होते. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठी होती. दरम्यान, जिल्हा लेव्हल वनमध्ये आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अनेक बाबतीत नियम शिथिल केले होते. त्यातच याच काळात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसून येत नसल्याचे जाणवले. भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील खासगी सभागृहात लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. यात जवळ जवळ १५० पेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित असल्याचे दिसून आले. याशिवाय कोविड-१९ अंतर्गत नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी संबंधित आयोजकांवर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला तसेच सदर प्रकार पुन्हा घडल्यास सभागृह सील करण्याची सूचनाही देण्यात आली.