दिघोरीत मारबतीची परंपरा कायम
By admin | Published: September 14, 2015 12:17 AM2015-09-14T00:17:44+5:302015-09-14T00:17:44+5:30
येथील मारबत उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सन १९०७ पासून सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
१०८ वर्षांची मारबत : सामाजिक एकोपा
मुकेश देशमुख दिघोरी / मोठी
येथील मारबत उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सन १९०७ पासून सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ‘ईळा पिढा टळो व बळीचे राज्य येवो’च्या गजरात मारबत उत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी ८ वाजता येथील शिव मंदिरात गावातील वॉर्डावॉर्डातून तयार झालेल्या मारबती एकत्रीत आल्या. यावर्षी एकूण २१ मारबती (पुतळे) संपूर्ण गावातून बनविण्यात आले होते.
सदर उत्सव ग्रामपंचायत कमेटी, तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या मारबत उत्सवात मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक एकोप्याचे उदाहरण सादर केले. शिव मंदिरातून निघालेली पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मारबतींची रॅली गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. तरुणाई डी.जे. च्या तालावर थिरकत होती तर वयोवृद्ध तंट्या भिल्लच्या दांडपट्टा बघण्यात मग्न होती. मागील तीन वर्षांपासून धुरपता गोटेफोडे ही महिला या उत्सवात स्वत: मारबत पकडत असते. त्यामुळे महिलांची उपस्थिती तथा उत्साह या मारबत रॅलीत बघण्यासारखा असतो. रॅलीतील प्रत्येक मारबतींवर विशेष असे शिर्षक दिलेले असतात. यात भ्रष्टाचार, रोगराई व इतर अनेक विषयांचा समावेश असतो. रॅलीत सहभागी झालेल्या मारबतींवर विविध विषयांवर आधारीत देखावा तथा संदेश लिहण्यात आला होता. यात शेतकऱ्यांच्या व्यथेपासून तर महागाईचे सावट आदी विषयांचा समावेश होता. संपूर्ण २१ ही मारबतींवर मनोरंजनात्मक शिर्षक लिहिले होते. मागील १०८ वर्षापासून संपूर्ण दिघोरीवासी जनता मारबत उत्सवात हिरहिरीने भाग घेऊन या उत्सवाचा आनंद घेत असतात. मारबत उत्सवामुळे गावात एकीचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यास खूप मदत होत असल्याचे दिसून येते. रॅलीदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांच्या सहकार्याने दिघोरीवासिांनी अन्य गावांपुढे आदर्श घालुन दिला आहे.