समयसूचकतेमुळे विद्यार्थिनी सुखरुप
By admin | Published: May 12, 2016 12:42 AM2016-05-12T00:42:52+5:302016-05-12T00:42:52+5:30
वेळ रात्री ८.३० ची. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर नवव्या वर्गात शिकणारी (खुशबू) काल्पनिक नाव. शाळकरी मुलगी येरझरा मारीत होती.
रेल्वे पोलिसांचे सहकार्य : तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील प्रसंग
तुमसर : वेळ रात्री ८.३० ची. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर नवव्या वर्गात शिकणारी (खुशबू) काल्पनिक नाव. शाळकरी मुलगी येरझरा मारीत होती. एकटीच असल्याने तिची नजर येणाऱ्या-जाणाऱ्याला न्याहाळत होती. तुमसर रोड रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या चाणाक्ष नजरेने ते बघितले. काहीतरी या मुलीसोबत चुकले आहे. रेल्वे पोलीस तिच्याजवळ जाऊन आस्थेने विचारपूस केल्यावर तिने गूढ उकलले. रेल्वे पोलिसाच्या समयसूचकतेने अनर्थ टळला.
दोन दिवसांपूर्वी रात्री ८.३० च्या सुमारास एक शाळकरी मुलगी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दुचाकीने आली. दुचाकी ठेवल्यावर तिने रेल्वे स्थानकात प्रवेश केला. एक्स्प्रेस व लोकल प्रवासी गाड्यांचे ये-जा सुरु होते. १४ ते १५ वर्षे वयोगटातील ही मुलगी रेल्वेस्थानकावर येरझारा मारीत होती.
काही वेळाने रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस अमर ढबाले यांच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले. काही वेगळे या मुलीच्या मनात वादळ घोंघावत असल्याची पक्की खात्री ढबाले यांची झाली. रेल्वे पोलीस ढबाले त्या मुलीजवळ गेले. आस्थेने विचारपूस केली. तिला रेल्वे पोलीस ठाण्यात घेऊन आले. थंड पाणी तिला दिले. पुन्हा मुख्य चौकशी सुरु केली. त्या मुलीने आपले नाव, शहराचे नाव, घरचा भ्रमणध्वनी क्रमांक सांगितला. घरी अभ्यासाचा तगादा लावला जायचा. त्याला कंटाळून मी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर आली. येथे आल्यावर काय करावे असा प्रश्न पला. आपण स्वत:ला संपवावे की कुठे निघून जावे हा वाईट विचार मनात येत होता. मी निर्णय घेऊ शकत नव्हते. म्हणून रेल्वे स्थानकावर येरझारा मारीत होते असे त्या मुलीने सांगितले.
त्या मुलीच्या घरी संपर्क साधून कुटुंबीयांना बोलाविण्यात आले. कटू प्रसंगाचे आनंदात रुपांतर झाले. कुटुंबीयांनी मात्र रेल्वे पोलिसांनी नाव उघड करू नये अशी विनंती केली. (तालुका प्रतिनिधी)