खाटांअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचाराची वेळ
By admin | Published: November 23, 2015 12:35 AM2015-11-23T00:35:36+5:302015-11-23T00:35:36+5:30
मागील अनेक वर्षापासून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून केलेली मागणी लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतरही धूळ खात पडली आहे.
व्यथा लाखांदूरची : उपजिल्हा रुग्णालयाची मागणी धूळ खात
लाखांदूर : मागील अनेक वर्षापासून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून केलेली मागणी लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतरही धूळ खात पडली आहे. खाटांची ३० व्यवस्था असल्याने जमीनीवर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर येवून पडली आहे.
लाखांदूर हे तालूक्याचे ठिकाण भंडारा जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर गडचिरोली जिल्हयाला लागून नक्षल प्रभावित आहे. तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असताना प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयातच रुग्णांना उपचाराकरिता, लोकसंख्येनुसार ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाला पाहिजे ही नागरिकांची आग्रही मागणी प्रशासनाकडून कानाडोळा केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. नुकतेच लाखांदूर ग्रामपंचायतीचा नगरपंचातीचा दर्जा मिळाला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा अपेक्षित असतांना लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी जातीने लक्ष देवून जनतेची मागणी शासनाकडे रेटून धरणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.
येथील ग्रामीण रुग्णालयात विष प्राषण, प्रसुती, अपघातात जखमी रुग्ण, सर्पदंश, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, हायड्रोशिल शस्त्रक्रिया शिबिरे मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. या रुग्णालयात मागील कित्येक वर्षापासून केवळ ३० खाटांची व्यवस्था केल्या गेली आहे. पंरतु रुग्णांचे वाढते प्रमाण बघून खाटा वाढविणे गरजेचे आहे. प्रसूतीकरिता आलेल्या महिला सिझर करिता त्रास सहन करीत असेल तर ती व्यवस्था या रुग्णालयात नसल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर केल्या जाते.
यावेळी बाळ व माता मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा आलेख दिसून येतो. येथील रुग्णालयात जनरेटरची सोय नाही, ब्लड बँक नाही, रक्त तपासणी, एक्सरे नाही, आठवड्यातून काही दिवस ठरले असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. उन्हळयाचे दिवस सुरु झाले लोडशेडिंगच्या काळात रुग्ण अंधारात मात्र रात्रपाळीचे कर्मचारी कुलर लावून सुखाची झोप घेतांनाचे चित्र दिसते. एकूणच उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पूर्ण झाल्यास, येथील रुग्णांना सर्वतोपरी उपचार घेऊन सुदृढ शरीराची आशा पल्लवीत होऊ शकते. रुग्णालयात आवश्यक औषध साठा व साहित्य उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषध विकत घ्यावे लागते. (तालुका प्रतिनिधी)