टिप्परने दोघांना चिरडले, नागरिकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:48 PM2019-01-28T21:48:55+5:302019-01-28T21:49:18+5:30

भरधाव टिप्परने चिरडल्याने दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्याच्या बेटाळा गावाजवळ सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. तब्बल सहा तासानंतर मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरच होते.

Tipper crushed both, Citizens' Rastaroko | टिप्परने दोघांना चिरडले, नागरिकांचा रास्तारोको

टिप्परने दोघांना चिरडले, नागरिकांचा रास्तारोको

Next
ठळक मुद्देबेटाळाची घटना : रस्त्यावर पेटविले टायर, वाहनांच्या दोन किलोमीटरच्या रांगा, सहा तास मृतदेह होते रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : भरधाव टिप्परने चिरडल्याने दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्याच्या बेटाळा गावाजवळ सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. तब्बल सहा तासानंतर मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरच होते.
श्यामसुंदर बाळाजी रायपूरकर (५०), परसराम कवडू दोहतरे (६५) रा. वायगाव ता. पवनी अशी मृतांची नावे आहेत. पवनी येथील एक लग्न समारंभ आटोपून ते आपल्या दुचाकीने गावी जात होते. बेटाळा गावाजवळील पेट्रोलपंपासमोर राँग साईड आलेल्या एका टिप्परने या दोघांना धडक दिली. दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली येवून अक्षरश: चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती होताच संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर टायर पेटवून पवनी- नागपूर राज्यमार्ग रोखून धरला. या घटनेची माहिती होताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील पेटते टायर बाजूला करण्यात आले. परंतु संतप्त जमावापुढे त्यांचे काहीही चालत नव्हते. मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची मागणी आंदोलकानी लावून धरली. नागरिकांचा संताप बघता भंडारा, अड्याळ येथून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि उपविभागीय महसूल अधिकारी प्रभाकर टिकस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर घटनास्थळी दाखल झाले.
अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर आंदोलनस्थळी पोहोचले. मृतकांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी लावून धरली. शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या देवून बसले आहेत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरु करण्यात आली. परंतु आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत मदत मिळत नाही. तोपर्यंत मृतदेह जागेवरुन हलविणार नाही. अशी भूमिका घेतली. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास यावर तोडगा निघाला. ट्रक मालकाकडून मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी तीन लाख रोख देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले. तसेच तहसीलदारांची गौण खनीज प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावरुन आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनामुळे राज्यमार्गावर दोन्ही बाजूला २ किमीपर्यंत वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. शामसुंदर रायपुरकर आणि परसराम दोहतरे हे दोघेही शेतमजूरी करणाऱ्या कुटूंबातील आहे. घटनास्थळावर चाकाखाली असलेले मृतदेह पाहून प्रत्येकजण हळहळत होता.
तहसीलदारांना निलंबित करा - नरेंद्र भोंडेकर
अवैध गौण खनीज उत्खननाचे दोन निष्पाप जीव बळी गेले असून या सर्व प्रकाराला पवनीचे तहसीलदारच जबाबदार आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी घटनास्थळी केली. ट्रक मालकाकडून मृतकांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही. तोपर्यंत मृतदेह जागेवरुन हलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

Web Title: Tipper crushed both, Citizens' Rastaroko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.