टायर फुटून कार उलटली अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:19 AM2018-01-28T00:19:23+5:302018-01-28T00:19:52+5:30
प्रजासत्ताक दिनाची सुटी साजरी करण्यासाठी नागपूरहून नागझिरा अभयारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या बाजुला उलटली.
आॅनलाईन लोकमत
साकोली : प्रजासत्ताक दिनाची सुटी साजरी करण्यासाठी नागपूरहून नागझिरा अभयारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या बाजुला उलटली. यात सहा विद्यार्थ्यांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारला दुपारी १ वाजता आलेबेदर गावाजवळ घडली.
आदित्य अतकरी (१९) रा.गणेशनगर नागपूर असे मृताचे नाव आहे. नागपूर येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाचे द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाचे सहा विद्यार्थी प्रजासत्ताक दिवसाची सुटी साजरी करण्यासाठी कार (एमएच ३०/ एच ३३५२) ने नागझिरा अभ्यारण्यात आले होते. अभयारण्याच्या पिटेझरी गेटवर पोहोचले. परंतु बुकिंग नसल्यामुळे त्यांना अभयारण्यात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ते नागपूरला परतीसाठी निघाले.
यावेळी कारमध्ये चार विद्यार्थी मागे तर दोघे समोर बसले होते. कार श्रेयांश सोईतकर हा चालवित होता. दरम्यान पिटेझरीच्या समोर आलेबेदर परिसरात कारचा डाव्या बाजुचा समोरचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जावून उलटली. या कारने तीनचार पलट्या खाल्ली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आदित्य अतकरी याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी अक्षय शिवाजी वैतागे (२४) रा.इतवारी नागपूर याच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर हे करीत आहेत.