चार महिन्यांपासून धानाचे चुकारे थकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:36+5:302021-06-03T04:25:36+5:30
स्थानिक लाखांदूर येथील दि विजयलक्ष्मी सहकारी संस्थेअंतर्गत गत खरिपात पुयार येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. ...
स्थानिक लाखांदूर येथील दि विजयलक्ष्मी सहकारी संस्थेअंतर्गत गत खरिपात पुयार येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्राअंतर्गत गत खरिपात जवळपास ५० हजार क्विंटल धानाची खरेदीदेखील करण्यात आली. ही खरेदी शासन निर्देशानुसार ३१ मार्चपर्यंत केली गेली. मात्र खरेदी पूर्ण होऊन २ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. शेतकऱ्यांद्वारा चार महिन्यांपूर्वी धानाची विक्री करूनदेखील अद्याप धानाचे चुकारे अदा न करण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांत रोष व्यक्त केला जात आहे.
तथापि, चुकारे अदा होण्याहेतू शेतकऱ्यांकरवी गत काही महिन्यांपासून संस्था प्रशासन व केंद्रचालक ग्रेडर यांना विचरणा केली असता, हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शासनाद्वारे या केंद्राअंतर्गत खरेदी केलेल्या धानाचे सर्व शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र ग्रेडरच्या हेतूपुरस्सर दुर्लक्षाने चार महिन्यांपासून या केंद्राअंतर्गत जवळपास पाच शेतकऱ्यांचे चार लाखांहून अधिक राशीचे चुकारे शासनाला परत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
बॉक्स :
बेकायदेशीरपणे ग्रेडरची नियुक्ती
दि विजयलक्ष्मी राईस मिल सहकारी संस्थेअंतर्गत शासनाच्या किमान समर्थन मूल्य योजनेनुसार गत खरिपात तालुक्यातील पुयार येथे सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रावर ग्रेडरची नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आली. मात्र या नियुक्तीविरोधात संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी तथा शेतकऱ्यांनी तक्रार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बॉक्स :
ग्रेडरला काढण्यासाठी आमसभेत ठराव मंजूर
दि विजयलक्ष्मी राईस मिल सहकारी संस्थेअंतर्गत गत काही वर्षांपूर्वी नियुक्त ग्रेडर धनराज पाऊलझगडे नामक व्यक्तीला प्रशासकीय कारवाई करीत निलंबित केले गेले. मात्र या कारवाईविरोधात ग्रेडरने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून, संस्थेच्या प्रशासकाद्वारा निलंबित ग्रेडरला नव्याने नियुक्ती करण्यात आली. या कारवाईपासून नाराज शेतकऱ्यांनी मागील वित्तीय वर्षात संस्थेअंतर्गत आयोजित आमसभेत ग्रेडरला काढण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रतिक्रिया :
धानाचे चुकारे लवकरच अदा होणार
पुयार केंद्राअंतर्गत ९ शेतकऱ्यांचे चुकारे विविध अडचणींनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. तथापि ९ शेतकऱ्यांपैकी ५ शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे लवकरच अदा करण्यात येणार आहेत.
आशिष बुरडे, संस्थासचिव