आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत
By Admin | Published: September 17, 2015 12:37 AM2015-09-17T00:37:15+5:302015-09-17T00:37:15+5:30
नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र आॅगस्ट महिन्याचे वेतन रखडल्याने सुमारे ८३५ कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
८३५ कर्मचारी आर्थिक संकटात : पगार पत्रक बनविणाऱ्याचे पद रिक्त
भंडारा : नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र आॅगस्ट महिन्याचे वेतन रखडल्याने सुमारे ८३५ कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व अन्य आरोग्य संस्थांमध्ये सुमारे ८३५ कर्मचारी कार्यरत आहेत. यात सुमारे ८५ वैद्यकिय अधिकारी तथा ७५० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी आरोग्य विभागाच्या अधिनस्थ राहून ग्रामीण नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी कार्यरत आहेत. असे असताना अनेकदा हे मुख्यालयी राहून कार्य करतात.
जिल्हयातील सातही तालुक्यात कार्यरत असलेल्या या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषदेतील वेतनपत्रक बनविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भरोशावर आहे.
मात्र आरोग्य विभागात रिक्त असलेल्या अनेक पदापैकी एक वेतनपत्रक बनविणाऱ्या कर्मचाऱ्याचाही त्यात समावेश आहे. जिल्हयात वर्ग ३ व ४ मध्ये मोडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अनुदान आरोग्य विभागाने दिलेले नाही. त्यामुळे आॅगस्ट महिन्याचा या कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. यासोबतच वैद्यकिय अधिकाऱ्यांनाही वेतनापासून वंचित राहावे लागले आहे.
अनुदान नसल्याने तथा वेतन पत्रक उशिरा प्राप्त झाल्याने या कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेत वेतन पत्रक बनविणाऱ्या कर्मचाऱ्याचे पद रिक्त असल्याने भुयार प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याला भंडारा आरोग्य अधिकाऱ्याचा कार्यालयात अतिरिक्त जबाबदारीवर बोलाविल्या जात होते. त्यामुळे तो एकमेव कर्मचारी जिल्हयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी तत्पर राहत होता. मात्र भुयार येथील वैद्यकिय अधिकाऱ्यानी सदर कर्मचाऱ्याला या महिन्यात अतिरिक्त जबाबदारीवर पाठविण्यास नकार दिल्याने वेतनपत्रक बनविण्याची जबाबदारी अन्य कुणाकडेही सोपविण्यात आली नाही.
तसेच ज्या व्यक्तीकडे वेतन पत्रक बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या कर्मचाऱ्याला संगणकाचे ज्ञान अवगत नसल्याची बाब समोर आली आहे.
गणपती सारखा महत्वाचा उत्सव असल्याने कर्मचाऱ्यांना वेतनाची नितांत गरज असते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित ठेवल्याने सर्व कर्मचारी आता ‘बाप्पा’लाच वेतन मागण्यासाठी विनवणी करावी लागण्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)