तीन महिन्यांपासून ऊसाचे चुकारे थकीत
By admin | Published: April 15, 2015 12:29 AM2015-04-15T00:29:15+5:302015-04-15T00:29:15+5:30
वैनगंगा शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही...
करडी (पालोरा) : वैनगंगा शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही. दि. ३१ मार्चपर्यंत चुकारे हाती न पडल्याने शुन्य टक्के व्याजाच्या रकमावर बँकाना व्याजाचा भुर्दंड द्यावा लागणार आहे. १५ दिवसात चुकारे वाटपाचे आश्वासन कारखान्याने पाळले नाही. थकीत चुकाऱ्याचे तातडीने वाटप करण्यात यावे, ऊसाला २,२०० रुपये भाव देण्यात यावा, अन्यथा कारखान्यावर पदयात्रा मोर्चा काढण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.
मोहाडी तालुक्यातील वैनगंगा शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन पहावयास मिळणार असे चित्र रंगविण्यात आले. कारखान्याच्या संचालकानी सुध्दा ऊसाला अधिक भाव देण्याचे आश्वासन देण्याबरोबर ऊस कटाईपासून न चुकता १५ दिवसात चुकाऱ्याचे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र सर्व आश्वासने खोटे ठरले. शेतकऱ्यांची फसवणुक करण्यात आली. लखपती शेतकरी तयार होण्याअगोदरच कंगाल शेतकरी दिसू लागला आहे. अच्छे दिन शेतकऱ्यांना कधीच दिसले नाहीत. परिणामी कारखाना प्रशासनाच्या बेजबाबदारपाणचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
देव्हाडा स्थित वैनगंगा शुगर कारखान्याचा गाळप हंगाम माहे नोव्हेंबर २०१४ मध्ये करण्यात आला. तेव्हापासून शेतकऱ्यांना २० जानेवारी पर्यंतच्या ऊसाच्या चुकाऱ्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना पैसे अजुनही मिळाले नाहीत. ऊसाचा भावही कमी देण्यात आला.
जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंतचे लाखो रुपयांचे चुकारे कारखान्याकडे थकीत आहेत. चुकारे लवकर होतील, अशी आश्वासने देण्यात आली. १५ दिवसात चुकारे देण्याचे आश्वासन पाळले नाही. यावर्षीचा खरिप हंगाम बुडाला. रब्बी पिकांनाही ऊन, पाऊस, वाऱ्याने झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील सोने मातीमोल ठरली. ऊसाच्या पैशाने निदान बँकाचे कर्ज भरता येईल, ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तीसुध्दा फोल ठरली.
३१ मार्चपर्यंत शुन्य टक्के व्याजदरांची कर्ज भरणे आवश्यक असते. पंरतू पैसेच हाती न आल्याने शुन्य टक्के रक्कमेच्या कर्जावर आता व्याज दयावा लागणार आहे. शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडला आहे. कारखान्याने लवकरात लवकर थकीत चुकाऱ्याचे वाटप करावे.
विलंबासाठी व्याजाचा भुर्दण्ड दयावा, ऊसाला प्रती टन २२०० रुपये भाव दयावा आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या आहेत. चुकाऱ्याचे त्वरित वाटप न झाल्यास १५ दिवसानंतर कारखान्यावर शेतकऱ्यांचा पदयात्रा मोर्चा काढण्याचा व गेट समोर सभा घेण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव संजय भोयर यांनी दिला आहे. (वार्ताहर)
तर ऊस लागवडीवर पडणार फटका
कारखान्यावर जानेवारीपासून जवळपास ६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कारखानदार पैसा नसल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे कारखान्यासाठी नवनविन यंत्र सामुग्री थेट पैसा देऊन खरेदी केली जात आहे. उसाचे चुकारे थकीत होत असल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर होत आहे.
- वासुदेव बांते,
अध्यक्ष राकॉ. मोहाडी
चुकारे लवकरच देऊ
साखरेचे मुल्यांकन वारंवार बदलत असल्याने बँकाकडून पाहिजे त्याप्रमाणात पैसा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे. शेतकऱ्यांचे चुकारे दिले जातील, थोडा अवधी लागेल. ऊसाला सरसकट १,७०० रुपये प्रति टनाचा भाव दिला जात असून बैलबंडीने वाहतुक करणाऱ्यांना १०० रुपये वाढवून दिले जात आहे.
- दादा टिचकुले,
उपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अॅण्ड पॉवर देव्हाडा.