शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:46+5:302021-07-26T04:31:46+5:30

बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारावर शेतकऱ्यांचा रोष ! लाखनी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रावर धान ...

Toba crowd at farmers' paddy shopping center | शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर तोबा गर्दी

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर तोबा गर्दी

Next

बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारावर शेतकऱ्यांचा रोष !

लाखनी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीचा शेवटचा दिवस असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे साठवून ठेवलेले धान आपल्या वाहनाने पर्यायी व्यवस्था करून बाजार समिती येथे आणले. शेवटचा दिवस असल्याने धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. धानाची आवक वाढल्याने बारदान्याची टंचाई व धान ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने काही काळ बाजार समिती परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शेतकऱ्यांची ही समस्या या क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या धानाची उचल झालीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिल्याने अधिकारी तात्काळ लाखनी बाजार समिती येथे दाखल झाले आणि आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या धानाची उचल करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

शेवटची तारीख असल्याने शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटसमोर धानाने भरलेले ट्रॅक्टर, ऑटो व ट्रकच्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस खोळंबा झाल्याने काही काळ वाहतूक थांबली होती. पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात ताठर भूमिका घेतली होती.

शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मात्र बाजार समितीचे कोणतेही पदाधिकारी समस्येचे निराकरण करण्यासाठी उपस्थित नव्हते. बाजार समिती व शेतकऱ्यांचे प्रतिनिधीच डोळेझाक करत असतील, तर शेतकऱ्यांनी न्याय मागावा कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांची ही समस्या आमदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शेवटी पटोले यांनी आपले प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, राजू पालीवाल व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू निर्वाण यांना कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे पाठविले, तसेच भ्रमणध्वनीवरून जिल्हा पणन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून संपूर्ण शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. डीएमओ येईपर्यंत शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना आकाश कोरे, राजू पालीवाल व राजू निर्वाण व सहकाऱ्यांना करावा लागला. डीएमओ आल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी त्यांनी आणलेल्या बारदान्यासहित केली गेली. शेवटी प्रशासनाने सहानुभूतीची भूमिका घेत आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान मोजून घेतल्याने प्रश्न सुटला. मात्र, लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पदाधिकारी अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला.

Web Title: Toba crowd at farmers' paddy shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.