तंबाखू सेवनविरोधी कायदा ठरला नावापुरताच

By Admin | Published: May 31, 2015 12:31 AM2015-05-31T00:31:30+5:302015-05-31T00:31:30+5:30

राज्य शासन तंबाखू बंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे. तत्पूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने ...

Tobacco Anti-Terrorism Act | तंबाखू सेवनविरोधी कायदा ठरला नावापुरताच

तंबाखू सेवनविरोधी कायदा ठरला नावापुरताच

googlenewsNext

आज जागतिक तंबाखूविरोधी दिन
शरीराला अपायकारक, मानसिकता बदलण्याची गरज
भंडारा: राज्य शासन तंबाखू बंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे. तत्पूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये, अशा प्रकारचा अध्यादेश काढला. परंतु या अध्यादेशाचे पालन होताना मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयाच्या भोवती तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री सुरु आहे. हा प्रकार सर्रासपणे सुरू असताना कारवाई कागदोपत्री ठरली आहे. त्यामुळे खरच राज्यात तंबाखू बंदी होईल काय, असा प्रश्न अनेक तज्ञ्जांना पडला आहे.
तरुणांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट या पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जात आहे. शासनाला या उत्पादनातून कर मिळत असला तरी आरोग्याचा विचार करता यावर योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक संस्थांनी तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यासाठी शासनावर दबाव टाकला असता तंबाखू उत्पादित वस्तूंवर वैज्ञानिक इशाऱ्याचा मजकूर व चित्र प्रकाशित करून शासनाने दुष्परीणाम सांगितले आहे. शहरांसह ग्रामीण भागातसुद्धा तंबाखू, गुटखा, सिगारेट आदी सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. शासन नियमाप्रमाणे या वस्तूची विक्री होत असली तरी मानवी आरोग्यासाठी या उत्पादनावर वैधानिक इशाऱ्यांचा मजूकर व चित्र प्रकाशित करण्याची सक्ती शासनाने केली.
तंबाखूमिश्रीत उत्पादित पदार्थाचे शाळकरी मुलापासून तर वृद्धांपर्यंत व्यसन आहे. सार्वजनिक ठिकाणी युवक सिगारेटचे खुलेआम सेवन करीत धूम्रपान विरोधी कायद्याची पायमल्ली करीत आहे. विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पानटपरीवर युवकाची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या व्यसनामासून होणाऱ्या दुष्परिणामाची कल्पना असतानाही युवक मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे. कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनाला या उत्पादनाबाबत कर मिळत आला तरी आरोग्याचा विचार झाला पाहिजे. यावर शासनाने योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
गुटखा व सुपारीचा खर्रा खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ यात तरुण आणि पुरुषांचे प्रमाण अधिक असले तरी शालेय मुले व महिलांचे खर्रा खाणे चिंताजनक आहे़ जिल्ह्यात अनेक पानटपऱ्यांवर दिवसाकाठी सुमारे आठ - दहा पोती सुपारी ‘खर्रा’च्या नावाखाली नागरिक फस्त करीत आहेत. खर्रा खाणे मानवी शरीराला घातक असले तरी याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाहीत.
राज्य शासनाने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आणण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध असताना या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात गुटख्याच्या पुड्या व खर्रा प्रसिध्द आहे़ कामावर जाणारे मजूरवर्ग, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी शिदोरी नेण्यासाठी एकदाचे विसरतील मात्र खर्रा नेण्यासाठी विसरत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
एक व्यक्ती दिवसाकाठी ४ ते ५ खर्रा खातो. काही दुकानांमध्ये एक ते दोन किलो सुपारीचा खर्रा तयार करण्यात येतो. ओला खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. हा खर्रा बनवून तयार ठेवण्यात येतो. ग्राहक येताच त्याच्या हातात खर्रा मिळत असल्याने या खर्ऱ्याचे शौकिन वाढले आहेत.
सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे़ लग्नाध्ये बँड हे मनोरंजनाचे मुख्य साधन आहे़ या बँडमुळे लग्न टाईम बेटाईम ठरली आहे़ यात तरूणवर्ग मद्याच्या आहारी मोठ्या प्रमाणात जातानी पाहत आहोत़ १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना गुटखा, तंबाखू विकणे कायद्याने दंडनिय गुन्हा आहे़ तरीपण आजच्या तरूणाच्या तोंडात लग्नाच्यावेळी व इतरवेळी गुटखा नसेल तर नवलच़ गावागावात थंडपेयाची, पाणपोई दिसणार नाही पण गुटखा दुकान मात्र राजरोसपणे उभे दिसतात़ पानठेल्यावर झुंबड उभी दिसेल तिथे शाळा, कॉलेज परिसरात ही सर्रास गुटखा विकला जातो़ सिगारेट ओढणे फॅशन ठरली आहे़ योगायोगाने आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यातील वाढत्या व्यसनावर आळा घालण्याची गरज आहे.
जिल्ह्यात लग्नसराईत पान दुकानदारांना चांगले दिवस आल्याचे चित्र आहे़ सदर प्रतिनिधीने आज फेरफटका मारुन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास ६० टक्के नागरिक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. पानठेल्यावर खर्रा घोटण्याचे यंत्र दिसून आले. बहुतांश पानठेल्यावर बालमजूर खर्रा घोटण्याचे काम करीत असताना दिसून आले. (नगर प्रतिनिधी)

असे व्हायला पाहिजे
शहर, गावातील प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये तंबाखू, गुटखा यांच्या विपरीत परिणामांचे फलक लावावेत.
नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या जाहिराती फलकापैकी दोन फलक गुटख्याच्या विपरीत परिणामासाठी राखीव असावे.
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यास दंड ठोठावावा.
तंटामुक्त गाव समिती प्रमाणेच तंबाखू सेवन विरोधी समिती नेमण्यात यावी.
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद व्हावी.
कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी.
जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभराच्या कारवाईचा आढावा घ्यावा.

डॉक्टर काय म्हणतात ?
राज्यात गुटखाबंदी करणे गरजेचे आहे. शासनाने विशेष प्रयत्न केले असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र शून्य दिसून येते. गुटखाबंदी साठी शासनाने तंबाखू उत्पादक कंपन्याच बंद केले तरच गुटखाबंदी मोहीम यशस्वी होईल. पर्यायाने तंबाखुमुक्तीची क्रांती होईल.
- डॉ.मनोज झंवर,भंडारा.
तंबाखुचे सेवनाने कर्करोग होतो. कर्करोगाचे विविध प्रकार आहेत. या आजाराची लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा ९० टक्के मृत्यू अटळ आहे. कर्करोग आजार टाळण्यासाठी नागरिकांनी तंबाखू सेवन न करण्याचा निर्णय घ्यावा.
- डॉ.दिलीप गिऱ्हेपुंजे,भंडारा.
तंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील अवयव निकामी होत जातात. प्राथमिक अवस्थेत कर्करोग आहे किंवा नाही याचे निदानच होत नाही. निदान झाल्यावर खूप उशिर झालेला असतो. ज्या तंबाखूच्या सेवनामुळे माणसाला जीवन गमवावे लागते, तरीही त्याचे सेवन करणे बंद होत नाही. दुसरीकडे तंबाखूच्या सेवनामुळे शरीराचा सर्वांगीण विकास खोळंबत असतो. यावर जनजागृती झालीच पाहिजे.
- डॉ.यशवंत लांजेवार,भंडारा.
तंबाखूचा सर्वात पहिला परिणाम हा मानवी हृदयाला होत असतो. तंबाखू हे मानवी हृदयासाठी विष आहे. दारू व तंबाखू सेवन करणाऱ्या इसमांना हे तर अत्यंत घातक आहे. तोंडाचा, पोटाचा व अन्ननलिकेचा कॅन्सर तंबाखूमुळे होत असतो. तसेच अन्य आजारही या एकट्या तंबाखुच्या सेवनामुळे होत असते. तंबाखू मुक्ती झाली तर आपोआप हृदयाचे आजार कमी होतील.
- डॉ.नितीन तुरस्कर,भंडारा.
तंबाखुमध्ये निकोटीन हा पदार्थ असल्यामुळे शरीराला त्याची गरज भासत जाते. परिणामी मानसीक दृष्ट्या संबंधित इसम दिवसेंगणिक तंबाखुचे सेवन करतच जातो. कर्करोग तर होतोच मात्र शरीरातील हाडेही ठिसूळ होत जातात. ही बाब फार उशिरा लक्षात येते. तोपर्यंत तंबाखू सेवन करणारा मृत्युच्या उंबरठ्यावर असतो. त्यामुळे तंबाखू आणि दारूच्या सेवनावर बंदी झाली पाहिजे.
- डॉ.गोपाल व्यास,भंडारा.
तंबाखूचे सेवन ही एक सवय आहे. तंबाखुमध्ये असणाऱ्या निकोटीनमुळे तंबाखुचे सेवन नियमित करावे, अशी सवय त्या इसमाला लागलेली असते. यासाठी स्वत:हून बदल घडविणे गरजेचे आहे. जनजागृती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर तंबाखू सेवनाची सवय बंद होवू शकते. या मोहिमेला घरापासूनच सुरूवात करावी लागेल.
- डॉ.मिलिंद देशकर,भंडारा.

पानठेला चालक म्हणतात
पानठेल्याच्या भरोशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. खर्राबंदी झाल्यास कुटुंब उघड्यावर येईल. शासनाने पानठेला चालकांना रोजगार देऊन तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करावी. आदेशाचे पालन करताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- अरविंद धुर्र्वेे.
हाताला काम नाही. बेरोजगारीमुळे पानठेला उभारला. या माध्यमातून मिळेल त्या उत्पन्नातून उपजिविका सुरु आहे. शासनाने तंबाखू बंदीच्या आदेश काढलाच तर त्याचे स्वागत आहे. मात्र बेरोजगाराची कुऱ्हाड उगारायच्यापुर्वी पर्यायी रोजगार उपलब्ध करुन द्यावे.
- शरद भूते.
तंबाखू मुक्तीसाठी झटतोय शिक्षक
भंडारा : आज जागतिक ‘तंबाखू व्यसन विरोधी दिन’ तंबाखूमध्ये अतिशय १००० हून घातक पदार्थ असतात. या घातक पदार्थापासून विद्यार्थी व समाज नेहमी दूर राहावे, यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल आसगाव येथील शिक्षक मारोती मेश्राम हे प्रयत्नशील असतात. विद्यार्थी या पदार्थापासून दूर राहावेत, यासाठी वर्षभर विविध उपक्रमातून तंबाखू विरोधी संदेश देतात.यासाठी शाळेत तंबाखूविरोधी स्पर्धां, भाषणे, प्रजासत्ताक दिनाप्रसंगी तंबाखू विरोधी रॅली, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, तंबाखूविरोधी राखी स्पर्धा, गुटखा-खर्रा विरोधी होळी, बालकदिन प्रसंगी तंबाखू विरोधी संदेश, तंबाखू विरोधी परिपाठात शपथ आदी उपक्रम राबवितात. समाजस्तरावर विविध मंडई महोत्सवात, जत्रा, धार्मिक कार्यक्रमे, भागवत सप्ताह, विविध जयंतीच्या कार्यक्रमात तसेच ग्रंथोत्सव, गणेशोत्सव, दुर्गामहोत्सव, सेवकसंमेलने या ठिकाणी तंबाखूविरोधी फलक लावून व संदेश देण्याचे कार्य करतात.प्रजासत्ताक दिनी या शिक्षकांने जिल्हाभर तंबाखूविरोधी कार्ड वाटण्याचे कार्य स्व:खर्चाने केलेले आहे. तंबाखूविरोधी उपक्रमातून बऱ्याच विद्यार्थ्यांचे व समाजातील व्यक्तींचे खर्रा व तंबाखू सोडण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. खर्रा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांस व व्यक्तिला योग्य बक्षिस देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. तंबाखू व्यसन विरोधी दिनानिमित्त उद्या ३१ रोजी तंबाखू विरोधी कार्ड सर्व कार्यालये, दखाखाने व सार्वजनिक ठिकाणी वाटून समाजाला यापासून दूर ठेवण्याचे ते कार्य करणार आहेत.

Web Title: Tobacco Anti-Terrorism Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.