तंबाखू सेवनविरोधी कायदा ठरला नावापुरताच
By admin | Published: May 31, 2016 12:42 AM2016-05-31T00:42:16+5:302016-05-31T00:42:16+5:30
सर्वाेच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये, ..
आज जागतिक तंबाखूविरोधी दिन
देवानंद नंदेश्वर भंडारा
सर्वाेच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये, अशा प्रकारचा अध्यादेश काढला. परंतु या अध्यादेशाचे पालन होताना मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयाच्या भोवती तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री सुरु आहे. हा प्रकार सर्रासपणे सुरू असताना कारवाई कागदोपत्री ठरली आहे. त्यामुळे खरच राज्यात तंबाखू बंदी होईल काय, असा प्रश्न अनेक तज्ञ्जांना पडला आहे.
तरुणांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट या पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जात आहे. शासनाला या उत्पादनातून कर मिळत असला तरी आरोग्याचा विचार करता यावर योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक संस्थांनी तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यासाठी शासनावर दबाव टाकला असता तंबाखू उत्पादित वस्तूंवर वैज्ञानिक इशाऱ्याचा मजकूर व चित्र प्रकाशित करून शासनाने दुष्परीणाम सांगितले आहे. शहरांसह ग्रामीण भागातसुद्धा तंबाखू, गुटखा, सिगारेट आदी सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. शासन नियमाप्रमाणे या वस्तूची विक्री होत असली तरी मानवी आरोग्यासाठी या उत्पादनावर वैधानिक इशाऱ्यांचा मजूकर व चित्र प्रकाशित करण्याची सक्ती शासनाने केली.
तंबाखूमिश्रीत उत्पादित पदार्थाचे शाळकरी मुलापासून तर वृद्धांपर्यंत व्यसन आहे. सार्वजनिक ठिकाणी युवक सिगारेटचे खुलेआम सेवन करीत धूम्रपान विरोधी कायद्याची पायमल्ली करीत आहे. विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पानटपरीवर युवकाची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या व्यसनासून होणाऱ्या दुष्परिणामाची कल्पना असतानाही युवक मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे. कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनाला या उत्पादनाबाबत कर मिळत असला तरी आरोग्याचा विचार झाला पाहिजे. गुटखा व सुपारीचा खर्रा खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ जिल्ह्यात अनेक पानटपऱ्यांवर दिवसाकाठी सुमारे आठ - दहा पोती सुपारी ‘खर्रा’च्या नावाखाली नागरिक फस्त करीत आहेत. खर्रा खाणे मानवी शरीराला घातक असले तरी याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाहीत.
राज्य शासनाने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आणण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध असताना या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात गुटख्याच्या पुड्या व खर्रा प्रसिध्द आहे़ कामावर जाणारे मजूरवर्ग, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी शिदोरी नेण्यासाठी एकदाचे विसरतील मात्र खर्रा नेण्यासाठी विसरत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. एक व्यक्ती दिवसाकाठी ४ ते ५ खर्रा खातो. काही दुकानांमध्ये एक ते दोन किलो सुपारीचा खर्रा तयार करण्यात येतो. ओला खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. हा खर्रा बनवून तयार ठेवण्यात येतो. ग्राहक येताच त्याच्या हातात खर्रा मिळत असल्याने या खर्ऱ्याचे शौकिन वाढले आहेत.
सदर प्रतिनिधीने आज फेरफटका मारुन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास ६० टक्के नागरिक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. पानठेल्यावर खर्रा घोटण्याचे यंत्र दिसून आले.
तंबाखुग्रस्तांसाठी समूपदेशन, उपचारासाठी बाह्य रुग्ण विभाग
जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखुग्रस्त रुग्णांसाठी समूपदेशन व उपचारासाठी बाह्य रुग्ण विभागाचे आयोजन केलेले आहे. या वर्षीची जागतिक तंबाखू नकार दिनाची घोषणा 'साध्या वेष्टनासाठी तयार रहा' आहे. या घोषवाक्याने सर्व देशांना प्रमाणित साध्या वेष्टनासाठी तयार होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
डॉ. पातूरकर म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेनुसार भारतात २०२५ पर्यत दरवर्षी तंबाखुमुळे मृतांची संख्या १५ लाखांच्या आसपास राहील. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेनुसार महाराष्ट्रात तंबाखू सेवण करणाऱ्या पुरुषांची संख्या ३६.५ टक्के तर, महिलांची संख्या ५.८ टक्के आहे. सर्वेनुसार भंडारा जिल्ह्यात तंबाखू सेवण करणाऱ्या पुरुषांची संख्या ४०.३ टक्के तर, महिलांची संख्या ११.९ टक्के आहे. तंबाखुमध्ये निकोटीन तसेच इतर शरीरास हानीकारक रसायन आढळून येतात. तंबाखुमुळे मुख्यत: मुख, श्वासनलिका, फुफ्फुस, अग्न्याशय, आतडी, गर्भाशय, मुत्राशय, रक्ताचे कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. तसेच ह्द्यरोग, अंधत्व, दमा, नपुंसंकता, वंधत्व, हाडाचे आजार, मानसिक आजार, निद्रानाश आदी आजार होण्याची शक्यता अधिक असते. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जागतिक तंबाखू नकार दिन आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पातुरकर यांनी केले आहे.
तंबाखूचे सेवन ही एक सवय आहे. तंबाखुमध्ये असणाऱ्या निकोटीनमुळे तंबाखुचे सेवन नियमित करावे अशी सवय त्या इसमाला लागलेली असते. यासाठी स्वत:हून बदल घडविणे गरजेचे आहे. जनजागृती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर तंबाखू सेवनाची सवय बंद होवू शकते. या मोहिमेला घरापासूनच सुरूवात करावी लागेल. तंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील अवयव निकामी होत जातात. प्राथमिक अवस्थेत कर्करोग आहे किंवा नाही याचे निदानच होत नाही. निदान झाल्यावर खूप उशिर झालेला असतो. ज्या तंबाखूच्या सेवनामुळे माणसाला जीवन गमवावे लागते, तरीही त्याचे सेवन करणे बंद होत नाही. दुसरीकडे तंबाखूच्या सेवनामुळे शरीराचा सर्वांगीण विकास खोळंबत असतो. यावर जनजागृती झालीच पाहिजे.
- डॉ.देवेद्र पातुरकर,
जिल्हा शल्य चिकित्सक,
सामान्य रुग्णालय, भंडारा.