तंबाखूमुक्तीचा ‘बालहट्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:31 PM2018-03-03T22:31:14+5:302018-03-03T22:31:14+5:30

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाची उपाययोजना तोकडी पडली आहे.

Tobacco Disclosure 'Balhat' | तंबाखूमुक्तीचा ‘बालहट्ट’

तंबाखूमुक्तीचा ‘बालहट्ट’

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंचांनी घेतली शपथ : ग्रामसभेत मांडणार तंबाखूमुक्त गावाचा ठराव

प्रशांत देसाई ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाची उपाययोजना तोकडी पडली आहे. किंबहूना ती केलेली नाहीच असे दिसून येते. शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या गोजिरवाण्या बालकांनी गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी घेतलेला पुढाकार सर्वांना अंत:र्मुख करणारा आहे.
लाखनी तालुक्यातील जेमतेम दोन हजार लोकसंख्येच्या सेलोटी गावात शालेय विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने प्रशासनाने काय दखल घेतली आता हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पाटी व पेन व खांद्यावर पुस्तकांचे दफ्तर असायला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी गावाच्या आरोग्यासाठी तंबाखूजन्य प्रदार्थांच्या विक्रीवर बंदी आणावे व गावाला त्यापासून मुक्त करावे, यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.
तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीने अनेकांना आपल्या कवेत घेतले आहे. गावातून या विक्रीचे समुळ उच्चाटन व्हावे, यासाठी अन्य कुणी नाही तर शालेय विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी गावतंबाखूमुक्त होण्यासाठी ग्रामपंचायतवर धडक दिली. यानंतर सरपंच देवनाथ निखाडे यांनी तंबाखूमुक्त गाव करण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून एखादे गाव तंबाखूमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचा जिल्ह्यातील हा अभिनव पहिलाच प्रकार ठरला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रण जिल्हा समन्वय पुरुषोत्तम झोडे यांचे मार्गदर्शन लाभले. तंबाखूच्या आहारी गावातील आबालवृध्द गेल्याने गावात सर्वत्र खर्रापन्नी तसेच पान व खर्राच्या पिचकाºयांमुळे परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून येते. मात्र तंबाखूमुक्त गावासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच यासाठी पुढाकार घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती ग्रामपंचायत पदाधिकारी यांना केली.
विद्यार्थ्यांच्या अभिनव धडक मोहिमेचे सरपंच देवनाथ निखाडे, उपसरपंच भुपेंद्र गेडाम, सदस्य सतीश लांडगे यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी तातडीने गावात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभा बोलावून निर्णय घेण्याचे सरपंच व उपसरपंच यांनी विद्यार्थ्यांना आस्वस्थ केले. दरम्यान विद्यार्थ्यांसमोर सरपंच व उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी तंबाखू, गुटखा, खर्रा असे तंबाखूजन्य पदार्थ खाणे सोडत असल्याची प्रतिज्ञा घेतली. मुख्याध्यापक सुधाकर झोडे, शिक्षक अमरदिप गणविर, वंदना ठवकर, रिंगला लांडगे यांचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना मिळाले.
विद्यार्थ्यांनी दिला अल्टीमेटम
आम्हाला आमच्या घरी व गावात होणाऱ्या तंबाखू, खर्रा, गुटख्याच्या त्रासापासून वाचवा. आमच्या गावात व आमच्या स्वत:च्या घरी निरोगी वातावरण जगू द्या. त्यासाठी गावात तंबाखू, खर्रा, गुटखा विक्रीवर बंदी घाला. प्लास्टीकपन्नीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवा, कुठेही थुंकल्याच गावाची होणारी अस्वच्छता टाळा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवेदनातून केली आहे. शाळेतील विद्यार्थी या मागणीला घेवून चक्क ग्रामपंचायतवर धडकले. शालेय शिक्षणासोबतच या विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. ३० एप्रिलपर्यंत ही मागण्या पूर्ण करावी असा इशारा शालेय मंत्रीमंडळाने दिला आहे. अन्यथा १ मे पासून लोकशाही मार्गाने असहकार्य करण्याचा निर्णय शालेय बालकांनी दिला आहे.

Web Title: Tobacco Disclosure 'Balhat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.