आता सरकारी कार्यालयातून तंबाखू होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:54+5:30
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या अध्यक्षतेत जिल्हा सनियंत्रण व समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेत शाळेतील आयईसी, जनजागृती व तक्रार, तंबाखूमुक्त शाळा, मौखीक तपासणी, तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्त कार्यालय आणि कारवाई या विषयावर चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय कार्यालयाच्या भिंती आणि कोपरे पान आणि खºर्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले दिसतात. येथे थुंकू नये असे फलक असलेल्या ठिकाणीच थुंकणारे महाभागही कमी नाही. शासकीय कार्यालयांची ही अवस्था तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच आता प्रत्येक शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई आणि गुन्हा नोंदविण्याचा निर्णयही भंडारा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्या अध्यक्षतेत जिल्हा सनियंत्रण व समन्वय समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेत शाळेतील आयईसी, जनजागृती व तक्रार, तंबाखूमुक्त शाळा, मौखीक तपासणी, तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्त कार्यालय आणि कारवाई या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. मनिष बत्रा यांनी सखोल मार्गदर्शन केले. या सभेत प्रामुख्याने तंबाखूमुक्त कार्यालयावर विशेष भर देण्यात आला. शहरातील शाळा, महाविद्यालयासह सर्व सरकारी कार्यालयाच्या १०० यार्ड आत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबंदी करुन कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्यासाठी कार्यालयाबाहेर तंबाखू निषेध फलक ठरविण्यात आले. कोणताही कर्मचारी तंबाखू किंवा खर्रा खाताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. दंड न दिल्यास थेट पोलिसात तक्रार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
तंबाखूमुक्त शाळा अभियान भंडारा जिल्ह्यात जोर धरत आहे. अनेक शाळा तंबाखूमुक्त होत आहे. त्यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशनचे किशोर ठवकर प्रयत्न करीत आहेत. परंतु या बैठकीत त्यांनी पवनी व लाखांदूर तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात उदासिन असल्याची खंत व्यक्त केली.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, प्रभारी पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण गाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, तुरुंग अधिकारी क्षीरसागर उपस्थित होते.
‘कोटपा’अंतर्गत ३१ हजारांचा दंड वसूल
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ‘कोटपा’ कायद्यांतर्गत तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करणाऱ्यांकडून यावर्षात ३१ हजार ८३७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती डॉ. मनिष बत्रा यांनी यावेळी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात. त्यांनी तंबाखू पासून दुर राहावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्याला बऱ्यापैकी यश येत आहे. मात्र शासकीय कार्यालयात आजही मोठ्या प्रमाणात तंबाखूचे सेवन होत आहे.