जि.प.च्या आज ८०० शाळा बंदचे आंदोलन
By admin | Published: October 6, 2016 12:49 AM2016-10-06T00:49:45+5:302016-10-06T00:49:45+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या आ वासून आहेत. निवेदन, आंदोलन, चर्चा निष्फळ करूनही त्यावर तोडगा निघालेला नाही.
शिक्षकांच्या प्रलंबित समस्या : साडेतीन हजारांवर शिक्षक देणार धरणे
भंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या आ वासून आहेत. निवेदन, आंदोलन, चर्चा निष्फळ करूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उद्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ८०० शाळांमधील शिक्षक, शिक्षिकांनी शाळा बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्हा परिषद भंडारा समोर उद्या एक दिवसाचे धरणे आंदोलन होत असून यात जिल्ह्यातील साडेतीन हजारावर शिक्षक सहभागी होत आहेत. या आंदोलनाचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करून गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञान युक्त विविध भौतीक सुविधांची संपन्नता आणण्यासाठी शाळांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. भंडारा जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या अनेक समस्या मागील दशकापासून प्रलंबित आहेत. त्या सोडवाव्या यासाठी शिक्षकांच्या विविध संघटनांनी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाशी दोन हात केले. मात्र केवळ आश्वासनापलिकडे शिक्षकांना काही मिळाले नाही. शिक्षकांच्या समस्यांमध्ये १ तारखेला वेतन व्हावे, पदोन्नत्या व बदल्यांसाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात, डी.सी.पी.एस.चा हिशोब अद्यावत करून व्याजासह रक्कम परत करावी, सेवेतील शिक्षकांना कायम केल्याचे आदेश देण्यात यावे, उपशिक्षणाधिकारी घोडेस्वार यांना कार्यमुक्त करावे, मानीव तारखेचे प्रकरण निकाली काढावे, आंतरजिल्हा बदली प्रस्तावांना त्वरीत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, नक्षलग्रस्त भागातील चुकीचे आदेश रद्द करावेत व वरिष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण) यांची नियमबाह्य केलेली पदोन्नती रद्द करावी आदी मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन शिक्षक कृती समितीचे गठण केले. या समितीच्या माध्यमातून उद्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद ठेवून सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७६७ प्राथमिक शाळा व हायस्कुलच्या ३२ शाळा अशा ८०० शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजारांवर शिक्षक, शिक्षिका सहभागी होत आहेत. जिल्हा परिषदेसमोर सकाळी ११ वाजता या एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, वसंत साठवणे, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, सुधीर वाघमारे, विकास गायधने, केशव बुरडे, राजन सव्वालाखे, सुधीर वाघमारे, दिलीप बावनकर, शंकर नखाते आदी शिक्षक नेते करणार आहेत. (शहर प्रतिनिधी)
चर्चा ठरली निष्फळ
जिल्ह्यातील शिक्षकांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिले. उद्या धरणे असल्याने यात सर्व शिक्षक सहभागी होत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे उद्या एकदिवसाचे शैक्षणिक कार्य सर्व शिक्षक कालांतराने पूर्ण करणार असले तरी यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांच्या कक्षात शिक्षक कृती समितीला चर्चेसाठी बोलाविले. मात्र यावर सदर अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या ८० टक्के समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.
शिक्षक कृती समितीची दिशाभूल
आंदोलनापूर्वी शिक्षक कृती समितीशी चर्चा करण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांच्या कक्षात बैठक बोलाविली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबाबत विचारणा केली असता ते मुंबईला असल्याचे सांगून समिती पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न वाळके व घोडेस्वार यांनी केल्याचा आरोप शिक्षक समितीने लावला आहे.
सर्व शाळांना राहणार कुलूप
मोहाडी : शिक्षकांच्या मागण्यांसाठी उद्या एकदिवसाचे शाळा बंद व सामूहिक रजा आंदोलन शिक्षकांनी पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ८०० शाळांना कुलूप राहणार आहे. याबाबत संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत वाटाघाटी सुरु असल्याने त्यावर तोडगा निघालेला नाही. मोहाडी तालुक्यातील ९९ प्राथमिक शाळा तसेच ८ हायस्कुलचे शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असून शाळेच्या चाव्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविल्या आहेत. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना एक दिवसाच्या अभ्यासाला मुकावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या ८० टक्के समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. याबाबत समितीशी चर्चा झाली, मात्र त्यांना तात्काळ निर्णय हवा होता. मात्र तसे करणे शक्य नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी हे एकदिवसापूर्वी मुंबईला गेले होते. ते परत आल्याची माहिती नसल्याने समिती पदाधिकाऱ्यांना ते नसल्याचे सांगण्यात आले. शिक्षक कृती समितीने पुकारलेले आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे.
- स्वर्णलता घोडेस्वार, शिक्षणाधिकारी (प्राथ.)