अड्याळ येथे दरवळणार आज भक्तीभावाचा सुगंध
By admin | Published: April 11, 2017 12:36 AM2017-04-11T00:36:26+5:302017-04-11T00:36:26+5:30
हिंदू मुस्लिम-बौद्ध-सीख या सर्वधर्मिय व सर्वपंथीय समाजाला एका धाग्यात गुंफण्याचे कार्य अड्याळ येथे सुरू आहे.
हनुमान जयंती उत्सव : सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी होणार विवाहबद्ध
विशाल रणदिवे अड्याळ
हिंदू मुस्लिम-बौद्ध-सीख या सर्वधर्मिय व सर्वपंथीय समाजाला एका धाग्यात गुंफण्याचे कार्य अड्याळ येथे सुरू आहे. सर्वधर्मसमभाव जोपासत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश ठरलेले अड्याळ येथील घोडायात्रा, मनोकामनापूर्ती ज्योतिकलश, भागवत कथा, बालाजी रथयात्रा आणि सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा, हनुमंताला साक्षी मंगळवारला संपन्न होत आहे. अड्याळ येथील हा उपक्रम लोकांनी लोकांकरिता उभारलेली लोकचळवळ ठरला आहे.
गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत सुरू असलेल्या या महायज्ञात स्वयंभु हनुमताची मुर्ती हजारो भाविकांना घोडायात्रेत खेचून आणते. प्राचीन काळापासून ही यात्रा प्रसिद्ध आहे. सामाजिक बांधिलकीच्या विचाराने समोर आलेल्या लोकांनी १९९० पासून सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा या नगरीत जोपासली आहे. सर्वधर्म समभावातून ग्रामविकास, एकात्मता समिती, हनुमान देवस्थान समिती, भागवत समिती व ग्रामवासीयांच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. कर्ज काढून, घर गहान ठेऊन मुला-मुलीचे लग्न लावण्याच्या या प्रथा, परंपरेला फाटा देत येथे नि:शुल्क लग्न लावून दिली जातात.
मंगळवारला हनुमान जयंती उत्सवादरम्यान पहाटे ४ वाजतापासून भागवताचार्य विरेंद्र महाराज पाण्डेय कोरबा यांच्या हस्ते हवनपुजन होईल. सात दिवसीय श्रीमद भागवत कथा हभप पितांबर मरघडे महाराज, पिंपळगाव यांच्या वाणीतून श्रवणीय ठरली आहे. सकाळी गोपालकाला दुपारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सर्वधर्म सामूहिक सोहळा होणार आहे.
दुपारी ३ वाजता महाप्रसादाचे वितरण होईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ४० ते ५० हजार लोक राष्ट्रीय एकात्मतेच्या छताखाली एकत्र येणार आहेत. या दहा दिवसीय कार्यक्रमात आध्यात्मिक, सामाजिक कार्य, ग्रामसफाई, काकड आरती, रामधून, प्रभातफेरी, हरिपाठ, सुंदरकांड, सामूहीक प्रार्थना व भागवत कथा पारायण होते. या परिसरातील ४० ते ५० हजार लोक सामूहिक भोजन करतात. हा कार्यक्रम नियोजनबद्ध असून ग्रामवासीय स्वयंसेवकांच्या भावनेतून काम करतात.
श्री हनुमान देवस्थान कमेटी, ग्रामविकास एकात्मता समिती, मुस्लिम कौमी एकता कमेटी, बुद्धीस्ट कमेटी, ग्रामपंचायत, अड्याळ पोलीस ठाणे, भागवत समिती आणि गावातील समाजसेवी संघटना आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामवासीय स्वत: मदतीला धावून येतात. भिक्षेकरीसुद्धा या महायज्ञात दान करून पुण्यपदरी पाडून घेत असतो. प्रत्येकजण भौतिक अहंकाराची झुल बाहेर काढून सामाजिक बंधूभावनेतून अड्याळच्या घोडायात्रेत सहभागी होत असतो, हे विशेष.