आज प्रेमोत्सवाचा दिवस!
By admin | Published: February 14, 2017 12:18 AM2017-02-14T00:18:13+5:302017-02-14T00:18:13+5:30
पाऊस पडत नसला तरी, प्रेम असतं भिजलेलं, त्याच्या तिच्या कुशीमध्ये अलगद निजलेलं...
प्रशांत देसाई भंडारा
पाऊस पडत नसला तरी, प्रेम असतं भिजलेलं,
त्याच्या तिच्या कुशीमध्ये अलगद निजलेलं...
अशी सर्वसाधारण हळवी भावना प्रेमाचा विषय निघाला की आपल्या हृदयात येते. हो हृदयातच! कारण प्रेम हा डोक्याचा विषय नव्हे किंवा बुद्धीचा तर मूळीच नव्हे. तो हृदयाचा विषय. ती एका हृदयाची भावना आहे. थेट दुसऱ्या हृदयापर्यंत पोचणारी. अर्थात विचार करणाऱ्या डोक्यालाही हृदयाशिवाय पर्याय नाही. रक्तातून डोक्याला आवश्यक ती ऊर्जा पोचविण्याचं कामही हृदयच करत असतं!
आज व्हॅलेंटाईन. अगदी हळुवार जपण्याचा दिवस. प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला क्षण न क्षण... तिच्याशी केलेला सुखसंवाद... पाऊस, चंद्र, चांदणी यांच्यासोबतच्या त्याच्या, तिच्या आठवणी. लडिवाळपणाचे मौन. रूसवा, फुगवा वगैरे वगैरे. ते चांदण्यांनी मंतरलेलं गुलाबी दिवस. कधीतरी नको असताना हे सगळं थांबून जातं. मग ‘रूटीन लाईफ’ सुरू होतं. कमी जास्त फरकाने प्रत्येकाच्या वाट्याला अशा हळव्या आठवणी असतातच. आज सोबत असोत अथवा नसोत. आजच्या दिवशी या सगळ्या आठवणी अगदी ताज्या होऊन समोर नाचू लागतात. निरनिराळा रंग, आकार, सुगंध असलेल्या फुलांची माळ शोभून दिसते. तशीच या आठवणींची माळ तयार होते. प्रेम ही नाजूकशी अन हळूवार भावना आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. ती प्रत्येकानं अनुभवाची असते, अन आपापल्या परीनं तिची व्याख्या करायची असते. प्रेमात हळवेपणा असतो, आदर असतो, सन्मान असतो, परस्परांना चुकांसह समजून घेण्याची वृत्ती असते. म्हणून तर प्रेमात जग जिंकण्याची ताकद असते असं म्हणतात.
प्रेम करणं खरचं एक विलक्षण अनुभूती आहे. ती एवढी विलक्षण आहे की आपलं प्रेम कोणी स्वीकारलं अथवा नाकारलं तरीसुद्धा आपल्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होत राहते. खरेखुरे प्रेम हे फुलांप्रमाणे असते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला तर ते गंध देतेच, मात्र पायदळी तुडविणाऱ्यांना देखील तोच अन तेवढाच गंध देते. पायदळी तुडविल्यावरदेखील प्रेम करणारं. प्रेमभंग ही कल्पना का व कशी रूढ झाली समजत नाही. जे तुटतं, भंग पावतं ते प्रेम असूच कसं शकेल. नश्वर अन क्षणार्धात नष्ट होऊ शकणाऱ्या गोष्टी भंग पावतात. भंग पावतात त्या भोगण्याच्या, वासनेच्या क्रूर इच्छा.... भंग पावते ती स्वार्थी वृत्ती.. एकवेळ देहसुद्धा भंग पावतो, नष्ट होतो. मात्र प्रेम कधीच नष्ट होत नाही. अर्थात भंग होणारं गोष्टीला आपण प्रेम म्हणूच शकत नाही.
प्रेमाचं जगच वेगळं असतं. प्रेम कधीही ओरबाडून घेता येत नसतं. ते हळुवारपणानं मिळत असतं. स्वत:च्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होणं अन त्यामुळे अवघ्या देहाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होणं म्हणजे खरं प्रेम असतं. ती अनुभूती भंग कशी पावेल? प्रेम कोणावरही करता येतं. झाडांवर, फुलांवर, पानावर, दगडावर, मातीवर, माणसा माणसांवर प्रेम करता येतं... फार दूर कशाला प्रेम स्वत:वरदेखील करता येतं.
त्यामुळं हळव्या आठवणी वाट्याला आल्या नाहीत म्हणून शोक करत बसण्यापेक्षा या क्षणापासून सर्व सृष्टीवर प्रेम करण्यास सुरुवात करा. बघा, स्वत:लाच बदल जाणवेल.
बजरंग दलाचा विरोध
भंडारा : पाश्चिमात्याच्या नावावर व्हॅलेन्टाईन-डे च्या माध्यमातून होणाऱ्या अश्लिलता आणि विभत्स्यतेचा विरोध करण्यात येणार असून जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक पर्यटनस्थळी १४ फेब्रुवारी रोजी विकृतवर्तन करणाऱ्या प्रेमीयुगुलांना धडा शिकविणार असल्याचे बजरंग दलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. व्हॅलेन्टाईन-डे सारख्या पाश्चात्य उत्सवांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे अनुकरण करुन जगात सर्वश्रेष्ठ मानली जाणारी भारतीय संस्कृतीचे विकृतीकरण करण्याचे कार्य होत आहे.