आज महासमाधीभूमी महास्तुपात उसळणार लाखोंचा जनसागर
By admin | Published: February 8, 2017 12:53 AM2017-02-08T00:53:36+5:302017-02-08T00:53:36+5:30
पत्र्त्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित ऐतिहासीक प्राचीन बुद्धनगरी पवनी पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील ...
विविध कार्यक्रमांची मांदियाळी : देश-विदेशातील बौद्ध भिक्खूंची उपस्थिती
पवनी : पत्र्त्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित ऐतिहासीक प्राचीन बुद्धनगरी पवनी पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील भारतातील सर्वात मोठ्या भारत-जपानच्या मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या रूयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुपाला १० वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्ताने येथे आज ८ फेब्रुवारीला धम्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या धम्मोत्सवात सहभागी होण्याकरीता देश विदेशातील बौद्ध भिक्क्षु येणार असून लाखोंचा जनसागर उसळणार आहे.
धम्मदुत भदंत संघरत्न मानके यांच्या अथक प्रयत्नाने महासमाधी भूमी महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. हा महास्तुप भारताच्या स्थापत्य क्षेत्रात नावीन्यपुर्ण ठरला आहे. ऐतिहासीक प्राचीन पवनी नगरी पुर्वी बुद्ध धर्माच्या प्रसाराचे मुख्य केंद्र होती. येथे सम्राट अशोकाच्या काळातील भारतातील सर्वात मोठा बौद्ध महास्तुप सापडला आहे. येथे आजही बुद्धकालीन अवशेष सापडतात. पण काळाच्या ओघात येथील बुद्ध धर्माचे प्रसार केंद्रही बंद झाले.
ऐतिहासीक पवनी नगरीला आपली प्राचीन, सांस्कृतीक प्रतिष्ठा परत मिळवून देण्याच्या उद्देशाने भदंत संघरत्न मानके यांच्या दुरदृष्टीतून ३० वर्षाअगोदर रूयाड सिंदपुरी येथे भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय स्तराचा महास्तुप निर्माण करण्याचे ठरविले गेले. हा निर्णय बौद्ध धर्माच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला आहे.
या महास्तुपाची शिल्पशैली ही जपानच्या परंपरागत स्तुप शैलीवर आधारित आहे. या स्तुपाचे वास्तुशिल्प जपानचे प्रख्यात वास्तुशिल्प तज्ञ नाकामुरा व ओकाजीमा यांनी तयार केले आहे. या महास्तुपाची वास्तू जपानी पॅगोडा शिल्पशैलीत आहे.
ही वास्तू आकाशात उंच उडणाऱ्या राजहंस पक्षाप्रमाणे दिसते. १० हजार चौरस फुट जागेत, १२० फुट उंचीवर ही वास्तू तयार करण्यात आली. या स्तुपाच्या निर्मितीला सुरवातीला अडचणी आल्या पण भारतीय वास्तुतज्ञांनी जपानी तज्ञांकडून बारकावे समजून घेवून या स्तुपाची निर्मिती केली.
हा महास्तुप पवनी तालुक्याच्या पर्यटन विकासात महत्वपूर्ण ठरलेला आहे. या स्तुपामुळे पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. या महास्तुपात दररोज मोठ्या संख्येने देश विदेशातील पर्यटक, बौद्ध उपासक येत आहेत.
हा महास्तुप आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर आज भव्य धम्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जपानच्या राजघरान्याचे बौद्ध विहार बिशामोंदो मोंझेकी कयोतोचे विहाराधिपती भदंत रवाशुहां एनामी व भदंत सोमोन होरिसावाजी यांच्या हस्ते भदंत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमामध्ये शांतीचे प्रतीक असलेले पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून लाखोंचा जनसागर उसळणार आहे. (शहर प्रतिनिधी)