शहापुरातील भीम मेळाव्यात उसळणार आज जनसागर
By Admin | Published: January 16, 2017 12:26 AM2017-01-16T00:26:27+5:302017-01-16T00:26:27+5:30
शहापूर येथील ऐतिहासिक भीम मेळावा हा आंबेडकरी बांधवांचा वारसा आहे. १६ जानेवारी रोजी या मेळाव्याचा ७३ वा वर्धापन दिन आहे.
७३ वा वर्धापन दिन : विविध कार्यक्रमांची रेलचेल, बौद्ध धर्मीय वर-वधू परिचय मेळाव्याचेही आयोजन
प्रल्हाद हुमणे जवाहरनगर
शहापूर येथील ऐतिहासिक भीम मेळावा हा आंबेडकरी बांधवांचा वारसा आहे. १६ जानेवारी रोजी या मेळाव्याचा ७३ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मेळाव्याला जनसागर उसळणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली शहापूरवासीयांनी या भीम मेळाव्याची सुरुवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐन उमेदीच्या काळात हा मेळावा झाला. आयोजक मोरेश्वर गजभिये यांनी मेळाव्यासंदर्भात सांगितले की, या भीम मेळाव्याच्या इतिहास रोमहर्षक व क्रांतीकारी आहे. १९३८ सालची ती घटना या गावामध्ये रोगाने थैमान घातला होता. त्याला आळा घालण्यासाठी अज्ञानातून एका साधूबाबाला बोलाविण्यात आले. सूचनेनुसार एक हवनकुंड बांधून हवन करण्याचे ठरविण्यात आले. त्यावेळचे पट्टीचे गवंडी बेलदार दिवंगत गंगाराम रंगारी यांनी नि:शुल्क हवनकुंड बांधून दिले होते. परंतु प्रत्यक्ष हवनाच्यावेळी रंगारी ते हवनकुंड हाताने चाचपू लागले. तेव्हा या अस्पृश्याच्या स्पर्धाने हवनकुंड बाटले व देवाचा कोप होवून पुन्हा गावात साथीच्या रोगाचा फैलाव होईल या अज्ञानातूनच गावातील स्पृश्य बांधवांनी त्याला अडविले. अस्पृष्यांनी बांधलेले हवनकुंड चालते, परंतु त्याचा स्पर्श चालत नाही. या अमानुष प्रकाराने गंगाराम रंगारी व्यथीत झाले. या बाबासाहेबांच्या संदेशानी त्यांच्यातील स्वाभीमान जागा झाला.
दिवंगत आत्माराम गजभिये, दिवंगत जैराम गजभिये व दिवंगत कवडू खोब्रागडे रंगारीच्या मदतीला ्नधावले. लगेच त्यांनी अस्पृश्य बांधवांची सभा बोलाविली. यात आपल्या उपासनेकरिता स्वतंत्र मंदिर बांधण्याची कल्पना मांडली. ती कल्पना सर्वांनी उचलून धरली. याच सभेत प्रत्येकांनी आपले योगदानही जाहीर केले. प्रत्येकांनी आठवड्यातून दोन आणे नियमित वर्गणी गोळा केली आणि पाहता पाहता या मंदिराचे निर्माणही पूर्ण झाले. विश्वनाथ मंदिर असे नामकरण करण्यात आले. याच अवधीत मंदिराला लागून अस्पृष्य वर्गातील प्रत्येक कुटुंबातील पती पत्नीने श्रमदानातून स्वतंत्र विहिर बांधून एक आदर्श निर्माण केला. यातून प्रेरणा घेऊनच परिसरातील गावात अस्पृषांच्या स्वतंत्र विहिर तयार झाल्यात. बोलताना गजभिये म्हणाले, शहापूर हे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख मोठे खेडेगाव आहे. परिसरातील आंबेडकरी जनतेला शहापूरवासीयांकडून खूप अपेक्षा होत्या.
एका सभेत १४ जानेवारीला भीमसागर या नावाने कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १४ जानेवारी १९४४ रोजी शहापूर येथे भीम सागराची सुरुवात झाली. त्यानंतर दरवर्षी १५ जानेवारी रोजी भीमसागर घेऊ लागला. १९५४ साली भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथे आले असताना वाटेत शहापूर येथे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत बाबासाहेब त्या मंदिरापर्यंत जाऊ शहले नाहीत. परंतु मोटारीतूनच त्यांनी ते मंदिर न्याहाळले होते. १ आॅक्टोबर १९५६ च्या बौद्ध दिक्षेनंतर विश्वनाथ मंदिरातील मूर्ती काढून सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यात आली. या मंदिराचा चेहरामोहरा बदलवून त्याचे बुद्ध विहार असे नामकरण करण्यात आले. एकदा भीमसागरच्या कार्यक्रमास नागपरुचे अॅड.सखारामपंत मेश्राम आले होते. कामठी येथे दरवर्षी १४ जानेवारीलाच भीमसागरचे आयोजन होत असे. त्यामुळे एकाच दिवशी या दोन्ही कार्यक्रमांना बौद्ध जनतेला उपस्थित राहणे अडचणीचे होते. म्हणूनच जनतेची गैरसोय टाळण्याकरिता शहापूर येथील भीमसागर १४ जानेवारीऐवजी १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात यावा. तसेच भीमसागर या नावाऐवजी भीममेळावा असे नाव देण्यात यावे अशी त्यांनी सूचना केली. अशाप्रकारे दरवर्षी कोणताही खंड न पडता १६ जानेवारीला भीम मेळावा भरू लागला, जो आजतागायत सुरु आहे.