जिल्हा लसीकरणात अव्वल; कोरोना निर्बंधात शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:00 AM2022-02-02T05:00:00+5:302022-02-02T05:00:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीवर कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे धोरण ठरविण्यात आले असून, जिल्ह्यात पहिला डोस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीवर कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे धोरण ठरविण्यात आले असून, जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १००.७४ टक्के तर, दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ८५.५७ आहे. त्यामुळे जिल्हा शासनाच्या परिशिष्ट अ मध्ये आला असल्याने, काहीअंशी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मंगळवारी एक आदेश निर्गमित केला आहे.
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९० टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के असेल तरच कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ५१ हजार २५ म्हणजे १००.७४ टक्के, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७ लाख ७० हजार ७० अर्थात ८५.५७ टक्के आहे. शासनाच्या सर्व निकषात जिल्हा बसत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अगदी अल्प आहे.
विवाहासाठी २०० पाहुण्यांची मर्यादा
n कोरोना संसर्गामुळे विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर निर्बंध लादण्यात आले होते. ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता नव्या नियमानुसार २०० पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडता येणार आहे. विवाह खुल्या मैदानाच्या आणि मंगल कार्यालयाच्या हाॅलच्या क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० यापैकी जे कमी असेल तेवढ्या नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहणार आहे. यासाठी तहसीलदारांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती
n सांस्कृतिक कार्यक्रम, लोक मनोरंजनाचे कार्यक्रम आणि भजन व इतर कार्यक्रमांना क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी तहसीलदारांची परवानगी घेणे आवश्यक राहील.
अंत्यसंस्कार उपस्थितीवर नसेल मर्यादा
n कोरोना संसर्गात अंत्यसंस्कारासाठी २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. त्यामुळे आप्तस्वकीयांनाही उपस्थित राहता येत नव्हते. परंतु आता नव्या आदेशानुसार अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येची मर्यादा राहणार नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारास कितीही नागरिक सहभागी होऊ शकतात.