जनआरोग्य योजनेत जिल्ह्यात १,८८५ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:38 PM2017-11-10T23:38:16+5:302017-11-10T23:38:34+5:30
महात्मा फुले जनआरोगय योजना, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम व ब्लड आॅन कॉल यासारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा फुले जनआरोगय योजना, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम व ब्लड आॅन कॉल यासारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना २०१३ पासून सुरु करण्यात आली असून या योजनेंतर्गत अनेक दुर्धर आजारावर उपचार करण्यात येतो. मागील दोन वर्षात भंडारा जिल्ह्यात योजनेत विविध प्रकारच्या १,८८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
जननी सुरक्षा योजनेत दोन वर्षात ११ हजार मातांना लाभ देण्यात आला. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना घर ते रूग्णालय असे नेआण करायची सुविधा आहे. या योजनेत १२ हजार ४३ मातांना प्रसुती पश्चात दवाखान्यातून घरी सोडायचा लाभ देण्यात आला. रक्ताची गरज केव्हाही आणि कुठेही भासू शकते. ऐनवेळी रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी जिल्हा रूग्णालयाच्यावतीने नियमित रक्तदान शिबिराचे अयोजन केले जाते. या शिबिरातून ८,८६८ पिशव्या रक्त जमा झाले आहे. हे रक्त गरजू व गरीब रूग्णांना जीवनदान देणारे ठरणार आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी व त्यानंतर उपचार यासाठी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये १,१७१ शाळांमधील १ लाख ७४ हजार ८१९ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. सदर शालेय तपासणीअंती २० हजार ८६१ विद्यार्थ्यांना शाळेतच औषधोपचार देण्यात आले. १७४ विद्यार्थ्यांवर आजारानुरूप शस्त्रक्रीया करण्यात आले. सन २०१५-१६ मध्ये अंगणवाडीतील बालकांची तपासणी करण्यात आली. ६ हजार २४ बालकांवर अंगणवाडीमध्ये उपचार करण्यात आले असून ७४० बालकांना संदर्भ सेवा पुरविण्यात आली. रूग्णांच्या सोयीसाठी जिल्हा रूग्णालयात १५ आॅगस्ट २०१६ रोजी नवीन व आधुनिक सिटीस्कॅन मशीन बसविण्यात आली. जिल्हा रूगणालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र वितरण करण्याकरीता १५ दिवसांची विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ३४१ दिव्यांगाना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
टोटल हिप रिप्लेसमेंट ही महागडी शस्त्रक्रीया भंडारा रूग्णालयात सुरू करण्यात आली. या शस्त्रक्रीया करण्यात भंडारा जिल्हा रूग्णालय सर्वात पुढे आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टपूर्ती मध्ये भंडारा रूग्णालयाने १६४-२७२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करून सलग तीन वर्ष राज्यात प्रथम येणाचा मान पटकाविला आहे.
पिसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्याचा ग्राफ वाढत आहे. सन २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९२० इतके होते. या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सन २०१५-१६ मध्ये जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण ९५१ वर गेले आहे. ब्लड आॅन कॉल ही सेवा १४ जानेवारीपासून सामान्य रूग्णालय येथे सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत १,७४९ रूग्णांना ही सेवा देण्यात आली. याशिवाय डायलेसिस युनिट या सेवेचा ३,९५८ रूग्णांना लाभ देण्यात आला आहे.