'ऑटोचालक ते सभापती', रितेश वासनिक यांचा खडतर व प्रेरणादायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 12:34 PM2022-05-09T12:34:09+5:302022-05-09T12:48:10+5:30

प्रस्थापितांच्या विरोधामुळे राजकीय जीवन डगमगले, पण पहिल्याच प्रयत्नात पंचायत समिती निवडणूक सर करून, सरळ सभापती पदावर वर्णी लागली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Tough and inspiring journey of ritesh wasnik from 'Auto Driver to panchayat samiti chairperson' | 'ऑटोचालक ते सभापती', रितेश वासनिक यांचा खडतर व प्रेरणादायी प्रवास

'ऑटोचालक ते सभापती', रितेश वासनिक यांचा खडतर व प्रेरणादायी प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देसभापती रितेश वासनिक यांची प्रेरणादायी कहाणी

तथागत मेश्राम

वरठी (भंडारा) : संघर्ष व संकटे यांना सामोरे जाणारा माणूस यशाचे शिखर गाठतो, ही उपमा रितेश वासनिक यांनी सिद्ध करून दाखविली. संघर्ष व संकटांना पाठ न दाखविता, त्यांनी मार्गक्रमण सुरू ठेवले. परिस्थितीशी लढा देण्याचा त्यांनी चंग बांधला. मित्रांच्या मदतीने ऑटो चालकाचा व्यवसाय पत्करला. ऑटो चालकाच्या समस्या सोडविण्याची धडपड सुरू झाली. सामाजिक कामामुळे ओळख निर्माण झाल्याने गर्दी वाढू लागली. प्रस्थापितांच्या विरोधामुळे राजकीय जीवन डगमगले, पण पहिल्याच प्रयत्नात पंचायत समिती निवडणूक सर करून, सरळ सभापती पदावर वर्णी लागली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

रितेश वासनिक यांचा ऑटो चालक ते थेट सभापती जीवन प्रवास खडतर आहे. बालवयात संकटे त्यांच्या दारावर उभी होती. हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या आईचा मोलाचा वाटा आहे. मोलमजुरी करून मुलांचे पोषण करण्याचे धर्य त्यांनी कायम ठेवले. आईच्या कष्टाची जान असलेल्या रितेशने बालवयात आईला आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला. शालेय शिक्षण पूर्ण करताना मिळेल ते काम करून उत्पन्नाचे स्रोत शोधले. लहानपणापासून ऑटो रिक्षा चालविण्याची ओढ होती, पण ऑटो रिक्षा विकत घेण्याइतके पैसे नसल्याने भाड्याचा ऑटो रिक्षा चालविला. यासाठी अविनाश रामटेके व पवन रामटेके यांनी त्यांना मदत केली. व्यवसाय व सामाजिक कार्य करताना स्वकमाईने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

अन्यायाची चीड असल्याने ते प्रस्थापितांच्या विरोधात पटकन उभे राहायचे. स्पष्ट बोलण्याचा त्यांच्यात असलेले गुण त्यांना अडसर ठरला. राजकीय पदार्पणात त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मात खावी लागली. दरम्यान, त्यांचे लग्न झाले. काही महिन्यांतच पंचायत समितीची पोटनिवडणूक लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पत्नीवर विश्वास दाखविला. त्या बहुमताने निवडून आल्या. १८ महिन्यांत रितेश व त्यांच्या पत्नी आकांक्षा यांनी कामाचा सपाटा लावला. लोकांच्या हाकेला धावून जाण्याची वृत्ती त्यांना जन आशीर्वाद रुपाने मिळाली.

लोकशाहीत बहुमत असल्याखेरीज सत्ता मिळत नाही, पण रितेश यांचे नशीब बलवत्तर होते. सत्ता स्थापनेएवढी संख्या नसतानाही पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यांची सभापती पदावर वर्णी लागली. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अन्नदानाचे काम सुरू आहे. दररोज शेकडो गरजूंना अन्न त्यांच्या केंद्रामार्फत मिळत आहे.

Web Title: Tough and inspiring journey of ritesh wasnik from 'Auto Driver to panchayat samiti chairperson'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.