नृसिंह टेकडीचा पर्यटन विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:49 AM2019-08-26T00:49:33+5:302019-08-26T00:50:14+5:30
शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी व तुमसर तालुक्याच्या सीमेवरील देव्हाडा - माडगी पर्यटनीय तिर्थस्थळाच्या विकासासाठी राज्य पर्यटन विकास निधीतून विविध कामांसाठी सुमारे एक कोटी ८९ लाखांचा निधी तीन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला. परंतु शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.
मोहाडी - तुमसर तालुक्याच्या सीमेवर वैनगंगा नदीपात्रातील बेटावर निर्मित भगवान नृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. या स्थळाला धार्मीक व पर्यटनीय महत्व आहे. पूर्व विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थळाच्या विकासासाठी अनेकांनी आश्वासनांची खैरात वाढली. मोठमोठ्या निधीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्ष निधी खेचून आणण्यात दमछाक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे स्थळ पर्यटनीय विकासापासून वंचित राहिला. कार्तिक पौर्णिमेला येथे १५ दिवसांची भव्य यात्रा भरते. या स्थळाला ऐतिहासिक महत्व असून पूर्व विदर्भात हजारो भाविक दरवर्षी येथे येतात.
मंजूर पर्यटन विकास निधीचा पहिला २० लाखांचा टप्पा मिळाला. दुसºया टप्प्यात नुकताच ३० लाखांचा निधी प्राप्त झाला. प्राप्त एकूण ५० लाखांच्या निधीतून डांबर रस्ता, नाली बांधकाम, सेफ्टी वॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तीन वर्षात विकास निधी केवळ ५० लाख रुपयांचा मिळाला. निवडणुकासमोर असल्याने सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांंच्या निधींची घोषणा करण्याचा सपाटा चालविला आहे. आश्वासनानंतर आश्वासने दिली जात आहेत. परंतु पाच वर्षापूर्वी निवडणुकीत मुंढरी ते रोहा पुलाच्या निर्माणाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाहीत. बंद पडलेले उद्योग सुरु झालेले नाही. नृसिंह टेकडीसाठी पुरेसा निधी खेचून आणला गेला नाही. आता चौंडेश्वरी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासासाठी दोन कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगून भूमिपूजन उरकण्यात आले. परंतु निधी पूर्ण मिळणार काय? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांचा आहे.
राज्य शासनाच्या पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी उर्वरित एक कोटी ३९ लाखांचा निधी मिळणे गरजेचे होते. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु मोठ्या निधीची घोषणा करून पाठ थोपटण्यात धन्यता मानली जात असल्याने नृसिंह टेकडीचा पर्यटनीय विकास रखडला आहे. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेला आहे.पर्यटनासाठी सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.
उर्वरीत विकास कामांना लागला 'ब्रेक'
राज्याच्या पर्यटन विकास निधीतून स्थळापर्यंत जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण, सीमेंटीकरण, नाली बांधकाम, सायकल स्टँड, सेफ्टीवॉल, सभामंडप, किचनरुम, अतिथीगृह, शौचालय व वॉशरुम आदी कामे केली जाणार आहे. ५० लाखांच्या निधीतून डांबररस्ता, नाली बांधकाम, सेफ्टीवॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. उर्वरीत कामांना निधीअभावी 'ब्रेक' लागला आहे.