लहान महादेव गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 05:00 AM2022-02-28T05:00:00+5:302022-02-28T05:00:07+5:30
१९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत.
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लहान महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसर तालुक्यातील गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला असून, येथे आतापर्यंत राज्य शासनाने केवळ ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग म्हणून १९९९ मध्ये मंजुरी दिली; परंतु तीर्थक्षेत्राचा विकास झाला नाही.
सातपुडा पर्वत रांगात निसर्गसौंदर्याने नटलेले गायमुख प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, तुमसरपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. यात्रेला २०० वर्षांचा इतिहास आहे. भंडाऱ्याचे दिवंगत यादवराव पांडे यांच्या काळापासून यात्रा भरत असून, पांडे यांची नवीन पिढी व जिल्हा प्रशासनातर्फे येथे यात्रेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येते. १९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. महाशिवरात्रीला येथे मध्य प्रदेश व विदर्भातून मोठ्या संख्येने येथे भाविक येतात. मात्र येथे सुविधा नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
गायमुख येथे जाण्यासाठी असलेला रस्ता उखडला असून भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासाकडेही दुर्लक्ष आहे.
गायमुख यात्रेचा इतिहास
- प्राचीन काळी येथे एक ऋषीने भगवान शिवाची तपस्या केली. त्यामुळे स्थळ पवित्र असल्याचे मानले जाते. येथे पंचमुखी भोलाशंकर, हनुमान, मकरध्वज, अंबाबाई, गोरखनाथाचे मंदिर असून, पंचमुखी भोलाशंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे. पार्वतीची प्राचीन विहीर पहाडावर असून, भाविक येथे भेट देतात. पलीकडील जंगलात मिनी नैनिताल, पांगडी जलाशय डोळ्यांचे पारणे फेडून जाते. गाईच्या मुखातून पर्वतीय झरा सतत वाहून एका जलकुंभात पडते. यावरून या स्थळाचे नाव गायमुख असे पडले आहे.