पर्यटनस्थळ देवसराळ अजूनही उपेक्षित
By Admin | Published: February 14, 2017 12:16 AM2017-02-14T00:16:45+5:302017-02-14T00:16:45+5:30
सन २०१२ पासून पर्यटन स्थळ ‘क’ दर्जा प्राप्त देवसराळ (घुटेरा) पर्यटन विकास निधीच्या अभावाखाली अजूनही उपेक्षित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
राहूल भुतांगे तुमसर
सन २०१२ पासून पर्यटन स्थळ ‘क’ दर्जा प्राप्त देवसराळ (घुटेरा) पर्यटन विकास निधीच्या अभावाखाली अजूनही उपेक्षित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पर्यटन स्थळाची पर्वणी लाभलेल्या तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगाच्या कुशित वसलेल्या निसर्गरम्य तसेच जागृत महादेवाचे मंदिर असलेल्या देवसराळ (घुटेरा) तिर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित व्हावे म्हणून युवा नेता ठाकचंद मुंगुसमारे यांनी प्रयत्न करून सन २०१२ मध्ये देवसराळला ‘क’ दर्जा पर्यटन स्थळ मिळवून दिले खरे. मात्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत मिळणारा अती अल्पनिधी त्यातही पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व असल्याने सतत या विभागात निधीचा ठणठणात पाहायला मिळत आहे.
पाच वर्षांच्या कार्यकाळात पर्यटन स्थळी जाण्याकरिता फक्त एक सिमेंट मार्ग व तेही अरुंदच बांधण्यात आले. परिणामी तिथुन ये- जा करतांना अनेकदा अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. मंदिरात जाण्याकरिता पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
निसर्गरम्य देवसराळ येथे जागृत महादेवाचे मंदिर असून ते १०० वर्षापुर्वीचे आहे. टेकडी व मोठे दगड चिरुन तिथून महादेवाच्या मूर्तीची निर्मिती झाली. काही दशकांपासून महाराष्ट्र व लगतच्या मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. महादेवाचे महात्म्य व निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण यांची भुरळ पाडणारा देवसराळ (धुटेरा) पर्यटन स्थळ आहे.
याठिकाणी वर्षातून चार वेळा संक्राती, शिवरात्री, नागपंचमी व श्रावण मासात भव्य यात्रा भरते. हजारो नागरिकांचे लोंढे देवसराळ येथे येत असतात. पंरतु पाहिजे तसा पर्यटन क्षेत्राचा विकास होवू शकत नसल्याची खंत हजारो भाविकांनी वाटते.
मात्र प्रत्यक्षात पर्यटन विकास निधीच्या नावावर पश्चिम महाराष्ट्राचे लोक डल्ला मारत आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी जातीने लक्ष घालुन पर्यटन विकास निधी उपलब्ध करुन उपेक्षीत असलेल्या पर्यटन क्षेत्राचा विाकस करावा अशीच पर्यटनप्रेमींची मुख्य मागणी आहे.