गुलाबी थंडीत पर्यटकांनी फुलू लागली पर्यटनस्थळे

By admin | Published: January 3, 2017 12:32 AM2017-01-03T00:32:39+5:302017-01-03T00:32:39+5:30

ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील ऐतिहासिक निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत.

Tourist spots flock to tourist destinations | गुलाबी थंडीत पर्यटकांनी फुलू लागली पर्यटनस्थळे

गुलाबी थंडीत पर्यटकांनी फुलू लागली पर्यटनस्थळे

Next

रोजगाराच्या संधीसाठी उपयुक्त : गोसेखुर्द धरण परिसरात सर्वाधिक गर्दी
लक्ष्मीकांत तागडे पवनी
ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील ऐतिहासिक निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत रोजच वाढ होत आहे. भेट देत असलेल्या पर्यटनस्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसीखुर्द धरण, रुयाड (सिंदपुरी) येथील पय्या मेत्ता संघाचा आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधी भूमी महास्तूप पवनीतील ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर व उमरेड कऱ्हांडलाचे पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटनस्थळाचा समावेश आहे.
पवनीपासून १२ किलोमिटर अंतरावर विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर, धरणाचे निळेशर पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ भव्य वक्रद्वारांनी धरणाला मोठे बनविले आहे. पवनी पासून ३ कि.मी. अंतरावरील रुयाड (सिंदपुरी) येथील पय्या मेत्ता संघ द्वारा निर्मित महासमाधीभूमी महास्तूप भारताच्या स्थापत्य क्षेत्रात नाविण्यपूर्ण ठरला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या महास्तुपाच्या निर्मितीमुळे देश विदेशामध्ये भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. शांतीचा संदेश देणारा हा महास्तूप भारत जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तुपामधील तथागत बुद्धांची ४० फूट उंच मूर्ती पाहून मनाला शांती देते.
पवनी हे ऐतिहासिक व प्राचीन शहर आहे. पवन राजाने या शहराला वसविले. ही त्यांची राजधानी होती. प्राचीन काळात पवनी अत्यंत वैभवशाली शहर म्हणून प्रसिद्ध होते. मौर्य, वाकाटक, शृंग, सातवाहन, यादव काळात हे शहर प्रगत होते. या शहरावर यादव, गौंड, भोसले राजांनी राज्य केले. यादवानंतर चंद्रपुरच्या गोंड राजाने पवनी येथील डोंगरावर १५ व्या शतकात किल्ला बांधला. परकोटसदृष्य किल्यामधून बंदुका -- आहेत. हा किल्ला ऐतिहासिक कलेची साक्ष देत आहे. पूर्व विदर्भाची काशी व मंदिराचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनीमध्ये विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशांची प्रतिमा ही १० व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. एका शिळास्तंभावर चारही बाजूला गणेशाची प्रतिमा कोरली आहे. पाचवी प्रतीमा नैऋत्य दिशेला कोरली आहे. शिळास्तंभाचा वरचा भाग ११ इंच गोलाकार आहे. ही प्रतिमा आकर्षक आहे. पर्यटक या मंदिरासोबतच टेंभेस्वामी मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, रांझीचा गणपती आदी मंदिरांनाही भेट देत आहेत. उमरेड - कऱ्हांडलाच्या पवनी वन्यजीव अभयारण्यातील जंगल घनदाट व विस्तीर्ण आहे. या जंगलात वाघ, बिबटे, हरीण, सांबर, चितळ, निलगाय व अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत.
सध्या थंडीच्या दिवसात पर्यटनाच्या दृष्टीने चांगला मानला जातो. त्यामुळे या गुलाबी थंडीत मोठ्या संख्येने पर्यटकांची पावले पवनी तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे वळत आहे.

Web Title: Tourist spots flock to tourist destinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.