पवन राजाचा किल्ला खुणावतोय पर्यटकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:08 PM2018-07-22T22:08:35+5:302018-07-22T22:09:01+5:30
मौर्य काळापासून थेट नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा पवन राजाचा पवनी येथील किल्ला पर्यटकांना खुणावत आहे. वैनगंगेच्या विशाल तीरावरील डोंगर माथ्यांनी वेढलेल्या या परिसरात सम्राट अशोकांचे काही काळ वास्तव्य होते. भंडारा जिल्हाचा समृद्ध वारसा सांगणारा हा किल्ला आजही अभ्यासकांसाठी पर्वणी आहे.
प्रदीप घाडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : मौर्य काळापासून थेट नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा पवन राजाचा पवनी येथील किल्ला पर्यटकांना खुणावत आहे. वैनगंगेच्या विशाल तीरावरील डोंगर माथ्यांनी वेढलेल्या या परिसरात सम्राट अशोकांचे काही काळ वास्तव्य होते. भंडारा जिल्हाचा समृद्ध वारसा सांगणारा हा किल्ला आजही अभ्यासकांसाठी पर्वणी आहे.
भंडारा जिल्हा मुख्यालयापासून ४२ कि़मी. अंतरावर पवनी तालुक्याचे ठिकाण आहे. पवन राजाच्या नावावरूनच या गावाला पवनी असे नाव पडले. पवनी हे हीनयान पंथाचे आराधना केंद्र होते. अशोकाच्या काळात भरभराटीस आले होते. सम्राट अशोकांचे येथे काही काळ वास्तव्य केले. त्यांची मुलगी संघमित्रा याच ठिकाणावरून श्रीलंकेला धर्म प्रसारासाठी गेल्याचे इतिहास सांगते. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इ.स. पूर्व पहिल्या शतकातला शत्रकुमार रूपाअंम्माचा स्तंभलेख येथे उत्खननात आढळला. आज तो नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात या परिसराचे वैभव सांगते. १९९४ मध्ये भारतीय पुराणवस्तु संशोधन विभागाचे डॉ. अमरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली या परिसराचे उत्खनन झाले. यात इ.स. पूर्व १५०० पर्यंतचा इतिहास उपलब्ध करणारे सोन्याच्या अलंकार, तांब्यांची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केशविन्यास करणारी मूर्ती, अरब देशाशी व्यापार झाल्याचे स्पष्ट करणाºया वस्तु आढळल्या. डॉ. मिराशे यांना हरदोला टेकडीच्या पश्चिमेला उत्खननास राजा भगदत्त यांना शिलालेख मिळाला.
गावाचा मुख्य रस्ता या किल्ल्याच्या दरवाज्यातूनच जातो. आजही हा किल्ला सुस्थितीत असून किल्ल्याची भिंत आणि तिचा पायथ्याशी असलेला बालसमुद्र तलाव पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. पवनीचा ऐतिहासीक वारसा सांगणारा हा किल्ला आजही पर्यटकांना खुणावत आहे. याच परिसरात अशोक स्तंभ, अनेक घाट, हाकेच्या अंतरावर रुयाळ येथे महासमाधी महाभूमी बोधीस्तुप पवनी-कºहांडला वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय प्रकल्प असलेले इंदिरा गांधी धरण (गोसीखुर्द) आहे. विदर्भाच्या वैभवात भर टाकणाºया या परिसराला पर्यटकांना भेट देवून निसर्गासोबतच ऐतिहासिक वैभवही जवळून अनुभवता येईल.
पवनीचा वैभवशाली इतिहास
पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथीयन, वाकाटक, गोंडराजे, भोसले आणि इंग्रजांनी राज्य केले. यादवांचे राज्य इ.स. १३१८ मध्ये लयास गेल्यावर देवगडच्या गवळीराजाने सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर चांध्यांच्या गोंड राज्याने हा प्रदेश जिंकला. इ.स. १७३९ मध्ये नागपुरच्या रघुजी भोसल्यांनी पवनीचा प्रदेश वलीशहा या गोंड राज्याचा पराभव करून जिंकला. त्यांनी तुळजोरामपंत या सरदाराला पवनीत बंदोबस्ताकरिता ठेवले. त्यांचे वंशज तुराणकर आजही आहेत. पवनीवर पेंढाºयांनी तिनदा आक्रमण केले. दोनदा पवनीकरांनी पराभव स्विकारला. तिसºयांदा मात्र एकजुट करून लोकांनी पेंढाºयांना पिटाळून लावले. तर २५ सप्टेंबर १८१८ ला मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजांनी भोसल्यांचा पाडाव करून पवनी हस्तगत केली.