भंडारा : दहीहंडी स्पर्धेत टॉवर गोविंदा पथकाच्या अंगावरच कोसळला
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 10, 2023 09:53 PM2023-09-10T21:53:50+5:302023-09-10T21:54:27+5:30
गोविंदा पथकाच्या अंगावरच तो कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याची घटना घडली.
भंडारा : आमदार नरेंद्र भोंडेकर मित्र परिवार आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित दहीहंडी स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात अपघाताचे गालबोट लागले. शेवटचा ५० फुटाचा परफॉर्मन्स राऊंड सुरू असताना अचानकपणे लाकडी टॉवर कोसळला. गोविंदा पथकाच्या अंगावरच तो कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याची घटना घडली.
शहरातील दसरा मैदान येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रम सुरू असताना, आज रात्री ८:१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. परफॉर्मन्स राऊंड असल्याने दहीहंडी ३५ फुटावरून ५० फूट उंचावर करण्यात आली होती. उभारण्यात आलेल्या दोन्ही लाकडी टॉवरवर मोठा हार व मध्ये दहीहंडीचा माठ लावण्यात आला होता. तसेच त्यावर हॅलोजन लाइटसुद्धा लावण्यात आले होते. दरम्यान, दोन गोविंदा पथके मिळून पाच ते सहा थर लावले असताना टोकावरील थराचा गोविंदा दोराला लटकला. सर्वजण गाण्यावर थिरकत असताना, स्टेजच्या उजव्या बाजूचा लाकडी टॉवर अचानक गोविंदा पथकांच्या अंगावर कोसळला. यामुळे एकच धावाधाव झाली. यात काही गोविंदा जखमी झाले. त्यांना अँम्ब्युलन्सने तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले.
सुदैवाने जीवितहानी टळली आहे. यानंतर आयोजकांकडून हा कार्यक्रम संपविण्यात आला. या संदर्भात आयोजकांच्या प्रतिनिधीकडे विचारणा केली असता कुणीही जखमी झाले नाही. मैदान ओले असल्याने टॉवर कोसळल्याचे सांगण्यात आले.