विषमुक्त शेती-जहरमुक्त अन्नासाठी गोपालन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:24 PM2018-06-11T22:24:24+5:302018-06-11T22:24:42+5:30
गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परंतु उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. या कंपण्यांच्या मालकांना आपला उद्योग निश्चिंतपणे करता यावा यासाठी देशात हिंदू व मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून आपला उद्देश साध्य करीत असल्याचा घणाघाती आरोप गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी निघालेले मोहम्मद फैज खान यांनी केला आहे.
गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी फैज खान यांनी २४ जून २०१७ पासून लेह (लद्दाख) येथून पदयात्रेला सुरूवात केली आहे. ही पदयात्रा १२ हजार किमीची आहे.
यावेळी ते म्हणाले, देशातील जमीन सुपीक करायची असेल तर देशी गोवंश आणि तिचे शेण व गोमुत्राशिवाय पर्याय नाही. नाहीतर युरीया व रासायनिक खताने धरतीमाता मृत पावेल. विषारी अन्न आपल्या पोटात जात आहे. यामुळे आजाराला आमंत्रण मिळत आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाबाने लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोपालन करणार नाही आणि गोहत्या करणार तर विषारी अन्न मुस्लीम, बौध्द, हिंदु, पंजाबी, सर्व धर्मीय लोक खातील व आजारी पडतील. परिणामी देशाचे नुकसान होईल. त्यामुळे देशी गौवंश पाळणे हाच त्यावर एकमेव पर्याय राहणार आहे.
मोहम्मद फैज खान हे लेह येथून २४ जून २०१७ ला निघाले आहेत. आतापर्यंत १२ राज्यातून प्रवास करीत ते रविवारला लाखनीमार्गे भंडाºयात आले. त्यांचे त्रिमूर्ती चौकात नगराध्यक्ष सुनिल मेंढे, प्रगतशील शेतकरी संजय एकापुरे, उद्योजक मयुर बिसेन, शैलेंद्र निकासक, नगरसेवक मंगेश वंजारी, युनिटी फॉर आॅलचे संयोजक सरफराज खान यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर त्यांच्या प्रबोधन कार्यक्रमाला शहरातील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.संजय एकापुरे यांनी विषमुक्त शेती करण्यासाठी देशी गौवंश पाळण्याशिवाय पर्याय नाही. विषमुक्त शेती जहरमुक्त अन्न तयार करण्यासाठी देशी गोवंश पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सद्भावना पदयात्रेचा उद्देश
देशी गोवंशाची सेवा, संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करणे, देशी गोवंशावर आधारित शेतीला प्रोत्साहित करणे, देशी गोवंशाचे पर्यावरण, समाज, आरोग्य व प्रकृतीमध्ये असलेले महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहचविणे, गोहत्यावर पूर्ण प्रतिबंध लावण्यावर कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जागृत करणे, नदींचे संरक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता व स्त्री भ्रुणहत्या याबाबत जनजागृती करणे, अखंड भारत निर्माण करणे आणि पुन्हा भारताचे प्राचीन वैभव स्थापित करुन भारताला विश्वगुरुचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपली ही पदयात्रा असल्याचे मोहम्मद फैज खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.